'या' बाजार समितीत कांद्याला मिळतोय 7000 रुपये क्विंटलचा भाव; वाचा... आजचे बाजारभाव!
राज्यासह देशभरात मागील वर्षी एल-निनोचा प्रभाव राहिल्याने कांदा उत्पादन काहीसे कमी राहिले. ज्यामुळे सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये आवक काहीशी कमी राहून, कांद्याच्या दर ३००० ते ३८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही काळापासून राज्यातील कांदा दर उच्च पातळीवर स्थिर आहेत. मात्र, असे असतानाच आता एका बाजार समितीत कांदा दराने तब्बल ७००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत मजल मारली आहे.
आवक 30 टक्क्यांनी घटली
केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जून ते जुलै या दोन महिन्यामध्ये चालू वर्षी देशभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक 12,39,280 टन इतकी राहिली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 17,71,505 टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कांद्याची आवक जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. ज्यामुळे कांदा दरवाढीला मदत झाली आहे.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी ‘हे’ शेतकरी ठरणार पात्र; कृषिमंत्री मुंडेंची माहिती!
त्रिशूर बाजार समितीत कांदा दर 7000 रुपयांवर
दरम्यान, सध्याच्या घडीला दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळमध्ये कांद्याची आवक खूपच कमी आहे. ज्यामुळे सध्या केरळमधील त्रिशूर या बाजार समितीत कांद्याचे दर तब्बल ७००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. याशिवाय केरळच्याच कोलेंगोडे बाजार समितीतही कांदा दराने 4400 रुपये प्रति क्विंटलची पातळी गाठली आहे. तर दक्षिणेकडील अन्य राज्यांमध्ये देखील कांदा दर काहीसे चढे असल्याचे पाहायला मिळत आहे.
आजचे महाराष्ट्रातील कांदा दर?
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजारात आज कांद्याला कमाल 3860 रुपये ते किमान 2000 रुपये तर सरासरी 3500 रुपये दर मिळाला आहे. लासलगाव – विंचूर बाजारात आज कांद्याला कमाल 3600 रुपये ते किमान 2000 रुपये तर सरासरी 3400 रुपये दर मिळाला आहे. मनमाड बाजारात आज कांद्याला कमाल 3690 रुपये ते किमान 1500 रुपये तर सरासरी 3500 रुपये दर मिळाला आहे. पुणे बाजारात आज कांद्याला कमाल 3500 रुपये ते किमान 1800 रुपये तर सरासरी 2650 रुपये दर मिळाला आहे.
हेही वाचा : नोकरी सोडली, ड्रॅगन फळाच्या शेतीत रमला; कमावतोय वर्षाला 10 लाख रुपये!
उत्पादनात 40 टक्क्यांनी घट
कांदा उत्पादन हे साधारपणे खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात घेतले जाते. गेल्या वर्षी असलेल्या एल-निनोच्या प्रभावामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील कांदा उत्पादन घटले होते. मात्र, केंद्र सरकारने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाढते कांद्याचे दर पाहता निर्यातबंदी लागू केली होती. ज्यामुळे लोकसभा निवडणूक काळात कांद्याचे दर पूर्णपणे घसरले होते. मात्र, सरकारच्या आकडेवारीनुसार उन्हाळी हंगामातील कांदा उत्पादन यंदा ४० टक्क्यांनी घटल्याने सध्याच्या घडीला देशभरातील बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्यामुळे कांदा दर वाढलेले पाहायला मिळत आहे.