नोकरी सोडली, ड्रॅगन फळाच्या शेतीत रमला; कमावतोय वर्षाला 10 लाख रुपये!
कोर्पोरेक्ट क्षेत्रात नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, अलीकडच्या काळात अनेक जण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून, शेतीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे या तरुणांना आपल्या ज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत… जो आज नोकरीपेक्षा शेतीमधून अधिक पैसा कमावत असून, त्याला ड्रॅगन फळाच्या लागवडीतून वार्षिक तब्बल १० लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
नोकरीला ठोकला रामराम
ऋतुराज सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो उत्तरप्रदेशच्या बिजनोर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ऋतुराज हा गुरुग्राम येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्या ठिकाणी मासिक 65 हजार इतका पगार देखील मिळत होता. मात्र, कोरोना काळात ऋतुराज गावी आला. आणि तो शेतीमध्ये रमला. त्यामुळे त्याने गावातच काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्याने कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा केली. आणि ड्रॅगन फळाची शेती करण्याचा चंग मनी बांधला. आणि तेव्हापासून त्याचा शेतीतील प्रवास सुरु झाला.
५ ते ६ लाख रुपयांची गुंतवणूक
ऋतुराजने 2020 मध्ये तीन बिघे शेतीमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली. त्याला सुरुवातीला त्यासाठी ५ ते ६ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. ड्रॅगनचे झाड वेलवर्गीय असल्याने, द्राक्ष बागेप्रमाणे त्याला आधार देण्यासाठी संपूर्ण उभारणी करावी लागते. असे तो सांगतो. सुरुवातीला ड्रॅगन फळाच्या लागवडीतून, वर्षभरातच जो नफा ऋतुराजला मिळाला. तो गुरुग्राम येथील कंपनीकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिक होता. २०२१ मध्ये त्याला ड्रॅगन फळाच्या लागवडीतून 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर त्याला २०२२ मध्ये तीन बिघे ड्रॅगन बागेपासून 1.76 लाख रुपये उत्पन्न मिळाले.
मिळवतोय वार्षिक १० लाखांचे उत्पन्न
ड्रॅगन फळाच्या शेतीतून मिळणारा नफा पाहता, ऋतुराजने सध्याच्या घडीला आपली ड्रॅगन बाग ६ बिघ्यांपर्यंत वाढवली आहे. वर्ष २०२४ मध्ये ऋतुराजला आपल्या ६ बिघे ड्रॅगन बागेतून तब्बल 40 से 45 क्विंटल उत्पन्न मिळाले असून, त्यातून त्याला बाजारभावानुसार १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळाले आहे, असे तो सांगतो. ऋतुराज हे आपला संपूर्ण माल हा स्थानिक बाजारपेठेत विक्री करतात. याशिवाय ते काही प्रमाणात माल हा अन्य बाजारपेठेत पाठवतात.