
Private Jets Demand: इंडिगो संकटाचा फायदा! चार्टर्ड फ्लाईट मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी; कॉर्पोरेट्स व लग्न समारंभांसाठी मागणीत वाढ
Private Jets Demand: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडिगोच्या कामकाजातील अडथळ्यांमुळे भारतीय नागरी विमान वाहतूक उद्योगाला मोठा फटका बसला. इंडिगोचा बाजारपेठेतील वाटा सुमारे ६५ टक्के आहे. या संकटादरम्यान कॉर्पोरेट गट आणि डेस्टिनेशन वेडिंग पार्टीनी खासगी विमानांकडे आपला मोर्चा वळविला. सर्वाधिक मागणी लोकप्रिय डेस्टिनेशन वेडिंग लोकल आणि बिझनेस हबशी जोडणाऱ्या मार्गांवर केंद्रित होती. देशातील अनेक महत्वाच्या शहरात खाजगी जेट बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली. शिवाय, चार्टर ऑपरेटर्सनी लहान ते मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट बँचेसकडून लक्षणीय बुकिंग नोंदवली.
चार्टर्ड फ्लाइट्सवर प्रवाशांचा विश्वास
इंडिगोच्या ऑपरेशनल मंदीमुळे चार्टर्ड फ्लाइट मार्केटमध्ये अनपेक्षित तेजी आली आहे. फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासच्या प्रवाशांनी चार्टर्ड जेटला पसंती दिली आहे. तसेच डेस्टिनेशन वेडिंग, कॉर्पोरेट ट्रॅव्हलसाठी खाजगी जेटची मागणी वाढली आहे. चार्टर्ड फ्लाइट्सचा ट्रेंड देशभरात वाढत आहे. आठवड्यातून अनेक दिवस हँगर्समध्ये निष्क्रय असलेल्या प्रायव्हेट विमानांचे वाढलेले पर्याय हे देखील याचे एक कारण आहे. ज्यामुळे निश्चित पंख असलेल्या (फिक्स्ड विंग) आणि रोटर पंख असलेल्या (रोटर विंग) विमानांद्वारे कमी अंतराच्या प्रवासाला वाव मिळत आहे.
नियोजित विमानसेवा कोलमडेल, तेव्हा जनरल एव्हिएशन प्रवाशांची संख्या वाढेल. या संकटाच्या काळात अनेकांना लग्न समारंभासाठी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठीचा प्रवास रद्द करावा लागला. रोटर पंख असलेल्या विमानांना निश्चित पंख असलेल्या विमानांइतके बुकिंग मिळाले नसले तरी, लवकरच लोक प्रवासासाठी कमी अंतराच्या हेलिकॉप्टरवरही विश्वास ठेवतील.
फ्लाइंग बड्स एव्हिएशनचे सीईओ आशिष कुमार सिंह म्हणाले की, देशभरातील विविध शहरांमध्ये पलाइंग बर्डस संकटाच्या काळात प्रायव्हेट जेट्सच्या चौकशीत जवळपास २५% तर बुकिंगमध्ये जवळपास १५% वाढ झाली. ज्यात दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली.
तसेच, पलायो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आकाश नाळे यांनी देखील “इंडिगोची विमान सेवा कोलमडल्याने त्या काळात चार्टर्ड फ्लाइट्स वेगाने बुक झाल्या. नियोजित फ्लाइट्समध्ये फर्स्ट क्लास किंवा बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चार्टर्ड विमानांकडे सर्वात मोठा बदल नोंदवला गेला. गोवा, उदयपूर आणि जयपूर येथील आलिशान डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रवास करणारे प्रवासी प्रायव्हेट विमानांकडे वळले.” असे सांगितले आहे.