सर्वसामान्यांना झटका..! कर्ज महागले; 'या' बँकांकडून कर्जावरील व्याजदरात मोठी वाढ!
अनेकांना आपल्या विविध कामांसाठी कर्जाऊ रकमेची आवश्यकता असते. त्यानुसार प्रत्येकजण आपआपले खाते असलेल्या बँकेतून कर्ज उभारण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, आता तुम्ही होम लोन, कार लोन किंवा अन्य कामांसाठी बँकांकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल. तर तुमच्यासाठी निराशाजनक बातमी आहे. देशातील काही आघाडीच्या बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे कर्ज महागले असून, तुम्हाला यापूर्वीच्या व्याजदरापेक्षा वाढीव दराने कर्ज मिळणार आहे.
आरबीआयचे व्याजदर ‘जैसे थे’
गेल्या काही काळापासून देशातील बँकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले आहे. मात्र, असे असतानाही आत देशातील काही बँकांकडून आता आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जावरील व्याजदर आधीच उच्च पातळीवर आहेत. अशातच आता काही बँकांनी आपले व्याजदर वाढवले आहेत. ज्यामुळे आता सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)
‘या’ बँकांनी वाढवले आपले व्याजदर
वैयक्तिक कर्जावरील व्याजदर आधीच महागडे असताना आता एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक या देशातील काही आघाडीच्या बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. खासगी क्षेत्रातील या बँकांनी आपले वैयक्तिक कर्ज जवळपास 30 ते 50 बेसिक पॉइंटने महाग केले आहे. परिणामी, आता वरील चारही बँकांच्या व्याजदरात आता 0.30 ते 0.50 टक्के वाढ झाली आहे.
रेपो रेट स्थिर असतानाही व्याजदरात वाढ
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जवळपास दीड वर्षांपासून आपल्या व्याजदरात कोणतीही वाढ केलेली नाही. असे असूनही मागील काही महिन्यांपासून बँकांच्या व्याजदरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आरबीआयचे व्याजदर वाढलेले नसताना खासगी बँकांच्या व्याजदरात वाढ कशी होते आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. आरबीआय दीड वर्षांपूर्वी आपल्या व्याजदरात शेवटची वाढ केली होती. त्यानंतर कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
काय आहेत चार बँकांचे नवीन व्याजदर
देशातील सर्वाधिक लोकप्रिय बँक एचडीएफसी बँकेने आपल्या व्याजदरात 0.40 टक्के वाढ केली आहे. ज्यामुळे आता वैयक्तिक कर्जाची सुरुवात 10.75 टक्क्याने सुरु होणार आहे. ॲक्सिस बँकेने आपल्या वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात 10.49 टक्क्यांवरून 10.99 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेने आपल्या व्याजदरात 10.50 टक्क्यांवरून 10.80 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. तर कोटक महिंद्रा बँकेने आपल्या व्याजदरात 10.50 टक्क्यांवरून 10.99 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.