फोटो सौजन्य - Social Media
भारतीय वीज वितरण क्षेत्रात मोठी कामगिरी करत महावितरणला ‘सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे हा पुरस्कार दिला गेला असून, नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते. महावितरणच्या या यशाबद्दल व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आभार मानले आणि महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
महावितरण संपूर्ण महाराष्ट्रात वीजपुरवठा करणारी देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी अशा 3 कोटी 11 लाख ग्राहकांना महावितरण वीज पुरवते. वीज वितरणाच्या प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ऊर्जा परिवर्तन आराखड्याच्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर, तसेच वीज खरेदी खर्चात कपात करून ग्राहकांसाठी वीजदर कमी करण्यासाठी उचललेली पावले या सर्व बाबींचा विचार करून महावितरणला या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले.
महावितरणने वितरण यंत्रणेतील सुधारणा, वीज उपकेंद्रे आणि नवीन वीज वाहिन्यांचे जाळे उभारणे, वितरण रोहित्रांची संख्या वाढवणे यावर विशेष भर दिला आहे. कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ ही देशातील सर्वात मोठी विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मिती योजना महावितरणने राबविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळवण्याची जुनी मागणी पूर्ण होणार असून, संपूर्ण कृषी पंपांना शंभर टक्के सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचे उद्दीष्ट आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महावितरणने देशात प्रथम स्थान मिळवले आहे. तसेच गावांना ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यासाठी ‘सौर ग्राम योजना’ सुरू केली असून, आतापर्यंत 10 गावे पूर्णतः सौर ऊर्जेवर कार्यरत झाली आहेत. महावितरणच्या स्वतःच्या कार्यालये, वीज उपकेंद्रे आणि ग्राहक सेवा केंद्रांना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
याशिवाय, विद्युत वाहनांसाठी राज्यभर 63 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली असून, पुण्यातील चार्जिंग स्टेशन थेट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाशी जोडण्यात आले आहे. यामुळे अक्षय ऊर्जेच्या वापराला चालना मिळत आहे. वीज वितरण क्षेत्रातील महावितरणच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.