फोटो सौजन्य - Social Media
उद्यमशीलता शिकवता येत नाही, ती मनामध्ये जन्म घेते, असे म्हटले जाते. अशीच काहीशी कहाणी आहे परकिन रोचा यांची. रॉयल ऑर्किड हॉटेल्समध्ये एक्झिक्युटिव्ह वाइस प्रेसिडेंट आणि बोर्ड सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडत असतानाही त्यांचं स्वप्न होतं, स्वतःचं हॉटेल चेन सुरु करण्याचं. अखेर त्यांनी मोठ्या पदाचा राजीनामा देत ECKO Hotels and Resorts ही स्वतःची कंपनी स्थापन केली.
गोव्यातील ख्रिश्चन कुटुंबातून आलेल्या परकिन यांचे वडील दिल्लीत गोडफ्रे फिलिप्स इंडिया मध्ये काम करत असताना अचानक निधन पावले. तेव्हा परकिन केवळ १३ वर्षांचे होते. त्यांच्या आई डोर्सी यांनी मुलाला सेंट कोलंबा स्कूलमधून शिकवले व नंतर दार्जिलिंगमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करायला पाठवलं. परकिन यांनी NDAची परीक्षा उत्तीर्ण केली होती, मात्र आईच्या आग्रहामुळे सैन्यसेवा ऐवजी हॉटेल व्यवसायातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण करून त्यांनी इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये काम सुरू केलं आणि शिक्षणही सुरूच ठेवलं. त्यानंतर लेमन ट्री हॉटेलच्या स्थापनेत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. नंतर रॉयल ऑर्किड हॉटेल्समध्ये EVP म्हणून ते बोर्ड सदस्य झाले. मात्र, मनात होतंच की स्वतःचं काहीतरी करावं. या दरम्यान, त्यांची लाडकी पाळीव कुत्री लैला हिचं निधन झालं आणि तिच्या अस्थींचं विसर्जन करताना हरिद्वारमध्ये गंगा तटावर बसलेले असताना त्यांना स्फूर्ती मिळाली. इथेच स्वतःचं हॉटेल उभारायचं. त्यांनी नोकरी सोडली आणि चुकम्बर हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कडून गंगाजवळ ३५ रूम्सचा हॉटेल लीजवर घेतला. त्याचं संपूर्ण नुतनीकरण करून गेस्टसाठी उघडले.
यानंतर त्यांनी ऋषिकेश, बद्रीनाथ, जोशीमठ येथे हॉटेल्स सुरु केली. लवकरच चारधाम संपूर्णपणे त्यांच्या हॉटेल्सनी व्यापले जाईल. पुरी, शिर्डी आणि जैन तीर्थांमध्ये हॉटेल्स उभारण्याच्या योजना अंतिम टप्प्यात आहेत. त्यांची पत्नी अंबिका सिंह या कोर्टयार्ड मेरियट मध्ये काम करतात. त्यांच्या सल्ल्यानुसार फक्त धार्मिक पर्यटन नव्हे तर लीजर टुरिझम चा देखील समावेश असावा म्हणून जिम कॉर्बेटजवळ ५१ विला असलेलं रिसॉर्ट उभारलं जात आहे, जे माईस आणि वेडिंग डेस्टिनेशन म्हणून विकसित केलं जात आहे. परकिन रोचा यांची ही कहाणी हे दाखवते की संकटनं भरलेला प्रवासही दृढ इच्छाशक्तीने यशाकडे घेऊन जातो.