खासगी नोकरदार दोन वेळच्या जेवणासाठी झगडतायेत; वर्क इंडियाचा धक्कादायक अहवाल समोर!
खासगी क्षेत्रात नोकरदारांना मिळणारा पगार हा अत्यंत तुटपुंजा असतो. या मिळणाऱ्या पगारावर संबंधित कर्मचारी हा केवळ त्याच्या कुटुंबाचा खाण्यापिण्याचा खर्च भागवू शकतो. त्याला घर, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करावी लागते. यातील बहुतांश लोकांची महिन्याकाठी कोणतीही बचत होत नाही, अशी परिस्थिती आहे. वर्क इंडियाच्या रिपोर्टनुसार, ज्या कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये किंवा त्याहूनही कमी पगार मिळत आहे. अशा कर्मचाऱ्यांना मुलभूत गरजांसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
57.63 टक्के नोकरदारांना तुटपुंजा पगार
वर्क इंडियाच्या अहवालानुसार, देशातील 57.63 टक्के खासगी क्षेञातील नोकरदारांना 20,000 रुपये किंवा त्याहून कमी पगार आहे. अशा परिस्थितीत या लोकांना किमान वेतनही दिले जात नाही. अहवालात असे दिसून आले आहे की, सुमारे 29.34 टक्के खासगी क्षेञात नोकऱ्या करणारे हे मध्यम उत्पन्न गटातील आहेत. यातील वेतन 20,000 ते 40,000 रुपये प्रति महिना आहे. अशा वर्गात मोडणाऱ्यांच्या जीवनात थोडीफार सुधारणा दिसून येते. माञ, त्यांचे राहणीमान हे आरामदायी नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या वर्गात मोडणारे कर्मचारी मुलभूत गरजा पुर्ण करत आहे. माञ, ते कोणतीही सेविंग करत नाही.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हेही वाचा – रक्षाबंधन हा फक्त सण नाही, …तर देशभरात होते तब्बल 12000 कोटींची उलाढाल! वाचा सविस्तर…
आर्थिक असमानतेला खतपाणी
दरम्यान याबाबत बोलताना वर्क इंडियाचे सीईओ नीलेश डुंगरवाल यांनी म्हटले आहे की, कमी पगाराच्या नोकऱ्यांमुळे आर्थिक असमानता निर्माण होत आहे. यामुळे आर्थिक आव्हाने तर येतीलच पण सामाजिक स्थिरतेवरही नकारात्मक परिणाम होईल. त्यासाठी कौशल्य विकास, पगार सुधारणा आणि उच्च पगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील. देशात सध्या केवळ 10.71 टक्के कर्मचाऱ्यांनाच 40,000 ते 60,000 रुपये दरमहा पगार मिळतो, असेही या अहवालात म्हटले आहे. केवळ 2.31 टक्के खासगी क्षेञात नोकऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 60 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार मिळत आहे.
2 वर्षांच्या जॉब डेटाच्या आधारावर अहवाल
विशेष म्हणजे हा अहवाल वर्क इंडिया प्लॅटफॉर्मवरील 2 वर्षांच्या जॉब डेटाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील २४ लाखांहून अधिक नोकऱ्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये फील्ड सेल्स पोझिशन्स सर्वात जास्त पगाराच्या नोकऱ्या आहेत. यानंतर बॅक ऑफिस जॉब आणि टेली कॉलिंग आहे. यामध्ये 40 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जात आहे.