रक्षाबंधन हा फक्त सण नाही, ...तर देशभरात होते तब्बल 12000 कोटींची उलाढाल! वाचा सविस्तर...
बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा टिकवून ठेवणारा रक्षाबंधन हा सण सोमवारी अर्थात १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यासाठी देशभरात मागील काही दिवसांपासून बाजारपेठा चांगल्याच सजल्या असून, त्यात मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील व्यापाऱ्यांची आघाडीची संस्था असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) याबाबत आकडेवारी समोर आणली आहे. त्यामुळे आता या सणामुळे देशभरातील राखी तयार करणाऱ्या व्यावसायिकांच्या कुटुंंबांना मोठा हातभार लागणार आहे.
बाजारातून चिनी राख्या गायब
यावर्षीच्या रक्षाबंधन सणासाठीची महत्वाची गोष्ट म्हणजे चीनमध्ये बनवलेल्या राख्या बाजारात दिसत नाहीयेत. मेक इन इंडियाचा प्रचार करताना व्यावसायिकांनी देशात बनवलेल्या राख्यांनाच प्राधान्य दिले आहे. याच पार्श्वभुमीवर यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी देशभरातील बाजारात जवळपास 12 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर रक्षाबंधन ते तुलसी विवाहपर्यंतच्या या सणासुदीच्या काळात देशात तब्बल 4 लाख कोटींचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हेही वाचा – मासेपालन व्यवसायातून महिलेने साधली आर्थिक प्रगती; करतीये वर्षाला 45 लाखांची कमाई!
यावर्षी रक्षाबंधनाच्या सणासाठी देशभरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये सणासाठीचा उत्साह दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात केवळ देशी राख्या विकल्या जात आहेत. यावर्षी बाजारात चीनमध्ये बनवलेल्या राख्यांना मागणी नाही.
4 लाख कोटींहून अधिक उलाढाल होणार
कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि नवी दिल्लीच्या चांदणी चौक परिसराचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, राख्यांची मागणी लक्षात घेता यावर्षी देशभरात रक्षाबंधनाच्या सणाला १२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो. मागील वर्षी रक्षाबंधनाच्या सणाला 10 हजार कोटींचा व्यवसाय झाला होता. दरम्यान,रक्षाबंधनच्या सणापासून 15 नोव्हेंबरच्या तुलसी विवाहाच्या सणापर्यंत सणासुदीच्या काळात देशभरातील बाजारात 4 लाख कोटींहून अधिक उलाढाल होईल, असा अंदाज आहे.