फोटो सौजन्य - Social Media
आजकाल किराणा माल, स्नॅक्स किंवा पाळीव प्राण्यांचं खाद्य घरपोच मिळणं अगदी सहज शक्य झालं आहे. मात्र गरजेची औषधं मिळवणं अजूनही काही ठिकाणी अवघडच वाटतं. ही अडचण ओळखून ‘रीपिल’ (Repill) नावाचं अॅप तयार करण्यात आलं आहे, जे केवळ 60 मिनिटांत औषधं घरपोच देण्याचा दावा करतं. यामागे आहेत दिल्लीचे रजत गुप्ता, जे अमेरिकेत तब्बल 1.5 कोटी रुपयांची नोकरी करत होते, पण भारतात काहीतरी उपयोगी करून दाखवण्यासाठी त्यांनी ती नोकरी सोडली. रजत यांनी परदेशात काम करत असताना आरोग्यसेवांमधील सुव्यवस्था जवळून पाहिली. तेव्हा त्यांच्या मनात भारतातही अशीच एक सुलभ प्रणाली सुरू करण्याचा विचार आला. त्यांनी 12 जणांच्या टीमसोबत जवळपास एक वर्ष मेहनत घेतली आणि अखेरीस जानेवारी 2025 मध्ये ‘रीपिल’ सुरू केलं.
सुरुवात झाली दिल्लीपासून, आणि अगदी थोड्याच कालावधीत 400 हून अधिक ऑर्डर्स पूर्ण झाल्या. औषधं डिलिव्हर होण्याचा वेळ सरासरी 30 ते 40 मिनिटांचा असतो. अॅपच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या यशानंतर आता हे अॅप नोएडा, गुरगाव, बेंगळुरू आणि मुंबईसारख्या महानगरांमध्येही विस्तारण्याच्या तयारीत आहे. पुढील टप्प्यात टियर 2 व टियर 3 शहरांमध्ये सेवा देण्याचं उद्दिष्ट आहे, कारण अशा ठिकाणी औषधं मिळणं अजूनही आव्हानात्मक असतं.
‘रीपिल’ अॅपचं उद्दिष्ट केवळ जलद डिलिव्हरीपुरतं मर्यादित नाही. रजत गुप्ताचं स्वप्न आहे एक असा आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म तयार करणं, जे प्रत्येक भारतीयाला वेळेत आणि योग्य प्रकारची औषधं उपलब्ध करून देईल. या अॅपद्वारे वापरकर्त्यांना त्यांच्या जवळच्या मेडिकल स्टोअरशी थेट जोडता येतं आणि प्रिस्क्रिप्शन मॅनेज करणेही सोपं होतं.
एकंदरीत, ‘रीपिल’ हा एक असा प्रयोग ठरत आहे, जो केवळ टेक्नॉलॉजीवर आधारित नसून सामाजिक गरज ओळखून तयार करण्यात आलेला आहे. रजतचा हा पुढाकार भारतीय आरोग्य व्यवस्थेमध्ये एक सकारात्मक बदल घडवणारा ठरेल, अशी आशा आहे.