
Airtel India चे एमडी आणि सीईओ म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार
गोपाळ विठ्ठल यांनी 10 वर्षांहून अधिक काळ कंपनीच्या एमडी आणि सीईओ पदावर काम केलं आहे. यादरम्यान कंपनीने मोबाईल, B2B, होम ब्रॉडबँड, DTH आणि डिजिटल सेवांमध्ये बिजनेसचा एक पोर्टफोलियो बनवला. मोबाईल सेक्टरमध्ये विठ्ठल यांच्या नेतृत्वात एयरटेलचा रेवेन्यू शेयर 30% नी वाढून 40% झाले. कंपनीने जारी केलेल्या मागील रिलीजनुसार, विठ्ठल आता पूर्ण ग्रुपमध्ये टेलीकॉमसंबंधित जबाबदाऱ्या संभाळणार आहेत. (फोटो सौजन्य – LinkedIn)
भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनीच्या संचालक मंडळाने, भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांची १ जानेवारी २०२६ पासून पाच वर्षांसाठी कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे.
गेल्या १३ वर्षांपासून गोपाळ विठ्ठल भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या सुनियोजित उत्तराधिकार प्रक्रियेचा भाग म्हणून गोपाळ विठ्ठल यांची भारती एअरटेल लिमिटेडच्या उपाध्यक्षपदीदेखील नियुक्ती करण्यात आली. आता गोपाळ विठ्ठल यांचा कार्यकाळ संपला असून कंपनीच्या नेतृत्वात बदल करण्यात आले आहेत. गोपाल विठ्ठल यांच्याजागी शाश्वत शर्मा यांची कंपनीचे नियोजित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या वर्षांत शर्मा या नव्या पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.
१ जानेवारी २०२६ पासून गोपाळ विठ्ठल कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतील. गोपाळ विठ्ठल यांच्याकडे भारती एअरटेल कंपनीसह सर्व उपकंपन्यांच्या कामकाजाचे नेतृत्व आणि देखरेख करण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल. गोपाळ विठ्ठल डिजिटल व तंत्रज्ञानासंबंधीच्या कामकाजांसह विविध निर्णय प्रक्रियेत सहभागी असतील. यामध्ये नेटवर्क धोरण, विविध कामकाजांविषयीची खरेदी प्रक्रिया तसेच मानव संसाधन या विविध विभागांच्या कामकाजांचे समन्वय साधणे तसेच या सर्व प्रक्रियेत समूहाची एकात्मता वाढवणे आदी कामकाजांचा समावेश असणार आहे. समूहाची धोरणात्मक दिशा ठरवणे आणि संस्थेला भविष्यातील बदलांसाठी सक्षम तसेच सज्ज करणे यावर त्यांचा विशेष भर असणार आहे. भविष्यकालीन नवकल्पना, तांत्रिक प्रगती आणि दीर्घकालीन वाढ सुनिश्चित करण्यासाठी गोपाळ विठ्ठल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
१ जानेवारीपासूनच शाश्वत शर्मा भारती एअरटेल इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धूरा सांभाळतील. गेल्या वर्षभरापासून शर्मा नव्या जबाबदारीच्या पूर्वतयारीचा सखोल अभ्यास करत आहेत. शर्मा हे नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदनामासह गोपाळ विठ्ठल यांच्यासोबत आगामी नियुक्त पदाची संपूर्ण माहिती घेत आहेत. त्यांनी पूर्वतयारी प्रक्रियेतच कंपनीच्या विविध कामकाजांचा जवळून अनुभव घेतला आहे. नवीन पदभार स्विकारल्यानंतर ते गोपाळ विठ्ठल यांना कामकाजाचा अहवाल देत राहतील.
सध्या सौमेन रे भारती एअरटेल इंडियाच्या मुख्य आर्थिक अधिकारी पदावर काम करत आहेत. पण येत्या काळात समूहाच्या मुख्य आर्थिक अधिकारी पदावर त्यांनी निवड केली जाणार आहे. गोपाळ विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सौमेन रे नव्या पदाचे कामकाज पाहणार आहेत. अखिल गर्ग सध्या कंपनीचे फायनान्शिअल कंट्रोलर म्हणून काम पाहत आहेत. येत्या काळात भारती एअरटेल इंडियाचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार आबे. गर्ग गेल्या १२ वर्षांपासून कंपनीच्या कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या काळात त्यांनी हेक्साकॉम आयपीओ यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यावसायिक प्रकल्पांचे यशस्वीरित्या नेतृत्व केले. शाश्वत शर्मा आणि सौमेन रे यांच्या देखरेखीअंतर्गत अखिल गर्ग नव्या पदाचे कामकाज पाहतील.
सध्या संयुक्त कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रोहित पुरी यांचा देखील कार्यकाळ आता संपणार आहे. आता पुरी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी म्हणून सर्व कामकाज पाहतील. ग्रुप कंपनी सचिव पंकज तिवारी हे गट स्तरावर आपले नेतृत्व आणि देखरेख कायम ठेवणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या धोरणात्मक कामकाजाची प्रक्रिया सुरु राहील.
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात मोठा बदल? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव
कंपनीच्या नेतृत्वबदलाबदद्ल भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी सांगितलं की, ‘‘एअरटेलमधील नेतृत्वाचा वारसा सोपवण्याची ही प्रक्रिया ज्या पद्धतीने पार पडली, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटत आहे. बदल आणि सातत्य हे दोन्ही एकत्रितपणे पुढे नेण्याचा यापेक्षा योग्य काळ असू शकत नाही. मला ठाम विश्वास आहे की, गोपाळ आणि शाश्वत हे दोघे भविष्यातही कंपनीच्या प्रगतीचा आणि यशाचा वेग कायम ठेवतील. मी दोघांनाही नवीन जबाबदा-यांसाठी मनापासून शुभेच्छा देतो.’’
मित्तल यांनी कंपनीच्या भविष्याची वाटचाल सुयोग्य दिशेने सुरु असल्याचेही सूतोवाच दिले. ‘‘कंपनीत अत्यंत उत्साही, कुशल आणि व्यावसायिक व्यवस्थापकीय संघ कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे. आम्ही नावीन्यपूर्ण उद्योजकीय कौशल्याच्या जोरावर जगभरातील कोट्यावधी ग्राहकांना सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि जागतिक दर्ज्याच्या सेवा पुरवत आहोत. मी गोपाळ तसेच संपूर्ण टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दूरसंचार कंपनी उभारण्याच्या आमच्या महत्त्वकांक्षेकडे वाटचाल करताना आम्ही हीच गुणवत्ता, सातत्या आणि नवकल्पनांची परंपरा पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे. ’’,असा निर्धार मित्तल यांनी व्यक्त केला.