राज्यात गेल्या ८ महिन्यापासून सोयाबीन दर हमीभावापेक्षा कमीच
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत, कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावांमध्ये वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काही मंडळींकडून स्वागत देखील करण्यात आले आहे. मात्र, गेल्या नोव्हेंबर २०२३ पासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च देखील मिळाला नसल्याची खंत अनेकदा शेतकऱ्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. त्यामुळे आता केंद्राकडून पिकांसाठी हमीभाव जाहीर करणे ही प्रथा केवळ सोपस्कार म्हणून पाळली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आठ महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी दर
केंद्र सरकारने 2023-24 च्या खरीप हंगामात सोयाबीनसाठी 4600 रुपये हमीभाव निर्धारित केला होता. ज्यात यंदाच्या 2024-25 च्या हंगामासाठी २९२ रुपयांनी वाढ करत तो यावर्षी ४८९२ रुपये प्रति क्विंटल इतका निर्धारित करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारने सोयाबीन पिकाच्या हमीभावात वाढ केली असली तरी, राज्यातील प्रमुख 48 बाजार समित्यांपैकी सध्या सोयाबीनला केवळ बाजार समित्यांमध्ये मागील वर्षीच्या हमीभावाइतका (४६०० रुपये प्रति क्विंटल) दर मिळत आहे. ज्यामुळे केंद्र सरकारने हमीभाव जाहीर करून देखील मागील सात ते आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांना सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याचे चित्र आहे.
(फोटो सौजन्य : istock)
केवळ ‘या’ २ बाजार समित्यांमध्ये ४६०० रुपयांहून अधिक दर
सध्याच्या घडीला नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला कमाल 4630 रुपये, किमान 4000 रुपये तर सरासरी 4300 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याशिवाय वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये कमाल 4620 रुपये, किमान 2800 रुपये तर सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. या दोन बाजार समित्या सोडल्या तर अन्य कोणत्याही बाजार समितीत सध्या सोयाबीनला गेल्या वर्षीच्या हमीभावापेक्षा अर्थात ४६०० रुपयांहून अधिक दर मिळत नाहीये. अर्थात ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
अनेकांचा सोयाबीन घरात
दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून सोयाबीन दराने शेतकऱ्यांना रडवले आहे. नोव्हेंबर २०२३ महिन्यात सोयाबीन ५००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. मात्र, त्यानंतर घसरण झालेल्या सोयाबीन दरात अद्यापही सुधारणा झालेली नाही. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सध्या आपला सोयाबीन घरातच साठवून ठेवल्याचे सांगितले जात आहे. तर खरिपाचा हंगाम सुरु झाला असताना, खते बियाणे यासाठीच्या भांडवल उभारणीसाठी पैसेच नसल्याने, गेल्या वर्षीचा सोयाबीन घरात किती दिवस ठेवायचा? असा सवालही अनेक शेतकरी उपस्थित करत आहेत.