20 नोव्हेंबरला शेअर बाजार बंद राहणार; 'या' कारणामुळे शेअर बाजाराला असेल सुट्टी!
चालू आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी फारच निराशाजनक राहिला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर, गेल्या 2 दिवसांत भारतीय शेअर बाजारात तेजी आली होती. जी फार काळ टिकली नाही. गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस केवळ घसरणीची लाल चिन्हे शेअर बाजारावर वर्चस्व गाजवताना दिसून आले आहे. अशातच आता शेअर बाजारासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय शेअर बाजारात सुट्टी असणार आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) या दिवशी कोणतेही काम होणार नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेअर बाजारात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शेअर बाजाराने याबाबत अधिकृतरित्या माहिती दिली आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर मार्केट एक्सचेंजवर शेअर बाजारास सुट्टी असेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे या दिवशी एक्सचेंजमध्ये कोणतेही काम होणार नाही. चलन बाजार आणि कमोडिटी एक्स्चेंजवर व्यापारासाठीही सुट्टी असेल. असे शेअर बाजाराकडून सांगण्यात आले आहे.
(फोटो सौजन्य – istock)
निवडणुकीचा दिवस असल्याने शेअर बाजारास सुट्टी
झारखंड विधानसभा निवडणुकही त्याच दिवशी होणार असून, उत्तर प्रदेशच्या 9 विधानसभा पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधून स्टॉक एक्स्चेंजचे कामकाज चालते. त्याच ठिकाणी निवडणुकीचा दिवस असल्याने शेअर बाजारात सुट्टी देण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राजकीय घडामोडी घडणार आहेत. याशिवाय सर्व मुंबईकर आणि महाराष्ट्रातील रहिवाशांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी शेअर बाजार बंद ठेवण्यात आला आहे.
नोव्हेंबरमध्ये 12 दिवस शेअर बाजार बंद
नोव्हेंबरमध्ये एकूण 12 दिवस शेअर बाजार बंद राहणार असून, प्रामुख्याने सण आणि विशेष सुट्ट्या यामुळे या सुट्ट्या असणार आहे. दिवाळीनिमित्त शुक्रवारी (ता.1) शेअर बाजाराला सुट्टी होती. यानंतर गुरु नानक जयंतीनिमित्त (ता.15) रोजी शेअर बाजारात सुट्टी असणार आहे. यानंतर बुधवारी 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे. याशिवाय नोव्हेंबरमध्ये महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवारसह एकूण 12 दिवस शेअर बाजारास सुट्ट्या असणार आहे.
एनएसईवर सुट्टीची अधिसूचना जारी
तर 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या बुधवारी (ता.20) शेअर बाजारास सुट्टी ठेवली जाईल.” असे राष्ट्रीय शेअर बाजारावर (एनएसई) एक्सचेंजने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)