स्विगी आयपीओला बाजारात कसा मिळतोय प्रतिसाद जाणून घ्या
फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Swiggy चा IPO नुकताच दोन दिवसांपूर्वी म्हणजे 6 नोव्हेंबर 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला. कंपनी $11.3 अब्ज म्हणजेच अंदाजे 95,000 कोटी रुपयांच्या मुल्यांकनाने पैसे उभारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्विगीची IPO मधून 11,327 कोटी रुपये उभारण्याची योजना असून यामध्ये 4,499 कोटी रुपयांची नवीन इक्विटी आणि 6,828 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून या आयपीओला थंड प्रतिसाद मिळत असल्याचे गुंतवणुकदारांकडून दिसून आले आहे. जाणून घेऊया स्विगी आयपीओबाबत सर्व माहिती (फोटो सौजन्य – iStock)
किती आहे प्राईस बँड
स्विगीने IPO साठी 371 रुपये ते 390 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. एका लॉटमध्ये 38 शेअर्स असतील. याचा अर्थ अपर प्राइस बँडनुसार किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,820 रुपये गुंतवावे लागतील. 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणूकदार या IPO मध्ये पैसे गुंतवू शकतील. शेअर्सचे वाटप 11 नोव्हेंबरला होणार आहे. तर, NSE आणि BSE वर 13 नोव्हेंबरला त्याची सूची होऊ शकते.
स्विगी आयपीओचा GMP
स्विगीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा GMP सध्या 12 रुपयांवर घसरला आहे, जो कि 3 टक्क्यांचा माफक लिस्टिंग फायदा दर्शवतो. ग्रे मार्केट हे अनलिस्टेड मार्केट आहे. येथे शेअर्सची खरेदी आणि विक्री आयपीओच्या सूचीपूर्वी होते. तथापि, येथील किंमती सतत बदलत राहतात.
काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे
ब्रोकरेज हाऊस एसबीआय सिक्युरिटीजने दीर्घ मुदतीसाठी स्विगीच्या आयपीओची सदस्यता घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी स्विगीचे काही सकारात्मक घटक सांगितले आहेत. उदाहरणार्थ, कंपनी उच्च-फ्रिक्वेंसी हायपरलोकल कॉमर्स विभागातील प्रमुखांपैकी एक आहे. मात्र, आदित्य बिर्ला कॅपिटलने स्विगीच्या आयपीओपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खडतर स्पर्धा आणि मूल्यांकनातील घट या नकारात्मक घटकांचा त्यांनी उल्लेख केला आहे.
कसे केले आहे मूल्यांकन
मूल्यांकनाबद्दल बोलताना, स्विगी फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर म्हणाले, “आम्हाला वाटते की आम्ही त्याची किंमत योग्य ठरवली आहे आणि आम्ही पुढील काही दिवसांची वाट पाहत आहोत.” स्विगीची उच्च किंमत बँडवर सुमारे $11.3 अब्ज (सुमारे 95,000 कोटी रुपये) किंमत आहे. जुलै 2021 मध्ये सूचीबद्ध झालेल्या प्रतिस्पर्धी Zomato चे बाजारमूल्य 2.13 लाख कोटी रुपये आहे.
स्विगीच्या व्हॅल्युएशनमध्ये कपात केल्याबद्दल मीडिया रिपोर्ट्सबद्दल विचारले असता, कपूर यांनी स्पष्ट केले की व्हॅल्युएशनमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कंपनीची खरी किंमत ठरते जेव्हा व्यवहार प्रत्यक्षात होतो. कपूर म्हणाले, “माध्यमांमध्ये मूल्याबाबत हे सर्व अनुमान लावले जात आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की हे मूल्य वाढलेले नाही किंवा कमीही झालेले नाही. जिथे मूल्य असायला हवे तिथेच ते आहे, असेदेखील कपूर म्हणाले.
हेदेखील वाचा – ॲपल कंपनीला या एआय कंपनीने टाकले मागे, बनलीये जगातील सर्वात मोठी कंपनी!
काय आहे सद्यस्थिती
दोन दिवस संपल्यानंतरही आतापर्यंत केवळ 35% सबस्क्राईब करण्यात आले आहे, ज्यामध्ये सर्वाधिक योगदान हे रिटेल गुंतवणुकदारांचे आहे. सध्या पहायला गेल्यास Swiggy IPO हे साधारणतः 85% रिटेल गुंतवणुकदारांनी सबस्क्राईब केल्याचे दिसून येत आहे. तसं पाहायला गेल्यास अजूनही उद्या संध्याकाळपर्यंत वेळ असून बरेचसे गुंतवणूकदार हे शेवटच्या क्षणी गुंतवणूक करतात हे नेहमीच दिसून आले आहे.