टाटा समूहाने करून दाखवलं; गाठला 400 अब्ज डॉलरचा पल्ला; ठरला पहिलाच समूह!
टाटा उद्योग समूह हा देशातील सर्वात जुन्या उद्योगसमूहांपैकी एक आहे. मात्र, आता टाटा समूहाने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. जो आतापर्यंत समकालीन असलेल्या अंबानी आणि अदानी समूहाला देखील करता आलेला नाहीये. त्यामुळे सध्या टाटा समूह चांगलाच चर्चेत आला आहे. टाटा समूहाने नुकताच ४०० अब्ज डॉलर बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे ४०० अब्ज डॉलर बाजार मूल्याचा पल्ला गाठणारा टाटा समूह हा देशातील आतापर्यंत एकमेव समूह ठरला आहे.
अंबानी दुसऱ्या तर अदानी तिसऱ्या क्रमांकावर
देशातील सर्वात जुन्या उद्योगपती घराण्यांमध्ये अंबानी समूह आणि अदानी समूह यांचा देखील समावेश होतो. मात्र, त्यांना देखील आतापर्यंत हा कारनामा करता आलेला नाही. त्यामुळे आता टाटा समूहाची ही मोठी उपलब्धी समजली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाचे सध्याचे बाजार मूल्य हे 277 अब्ज डॉलर इतके आहे. अंबानी समूह बाजार मूल्याच्या बाबतीत देशात दुसऱ्या स्थानी आहे. तर 206 अब्ज डॉलर बाजार मुल्यासह अदानी समूह देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या तीनही समूहांचे बाजार मूल्य एकत्रिपणे 884 अब्ज डॉलर्स इतके आहे.
हेही वाचा : कॉलेजचं तोंडही पाहिलं नाही, आज 16,000 जणांना दिलाय रोजगार; वाचा… दोघा भावांची यशोगाथा!
किती आहे टीसीएसचे बाजारमूल्य
टाटा समूहाच्या एकूण बाजारमूल्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमुळे फायदा झाला आहे. टाटा समूहाच्या बाजार मूल्यात 47 टक्वे हिस्सा हा टीसीएस कंपनीचा आहे. टीसीएस कंपनीचे बाजारमूल्य 190 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. कंपनीच्या शेअर्सने 4,422.45 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. टीसीएस कंपनीची ही कामगिरी वित्तीय सेवा, तंत्रज्ञान, माध्यम आणि दूरसंचार क्षेत्राच्या बळावर झाली आहे.
टाटा समूहाचे शेअर्स तेजीत
टीसीएसनंतर टाटा समूहाची दुसरी सर्वात मोठी कंपनी टाटा मोटर्स देखील विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहे. ऑटोमोबाईल कंपनीच्या शेअर्सनी केवळ तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये 12 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. जग्वार लँड रोव्हरच्या आधारे टाटा मोटर्सचा नफा आणखी वाढेल. टाटा समूहाला टायटन आणि टाटा स्टीलसारख्या कंपन्यांचाही फायदा झाला आहे. टाटा समूहाच्या मार्केट कॅपमध्ये या चार कंपन्यांचा हिस्सा सुमारे 75 टक्के आहे.