कॉलेजचं तोंडही पाहिलं नाही, आज 16,000 जणांना दिलाय रोजगार; वाचा... दोघा भावांची यशोगाथा!
देशात असे अनेक जण आहेत. ज्यांना उच्च शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छशक्ती असते. मात्र, घरची बेताची परिस्थिती असल्याने, अनेक जण कमाईचा काहीतरी मार्ग निवडतात. आणि आपला परिवार सुखाने चालवत असतात. मात्र, अशातही काही जण गप्प बसत नाही. आहे त्या क्षेत्रात मोठी गगनभरारी घेतात. आज आपण अशाच एका व्यक्तीची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी कधीही कॉलेजचे तोंड सुद्धा पाहिलेले नाही. मात्र, त्यांनी आज आपल्या कंपनीच्या माध्यमातून तब्बल १६ हजार जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
देशातील सर्वात मोठी औषधनिर्माण कंपनी
संजीव जैन आणि संदीप जैन असे या दोघा भावंडांचे नाव असून, ते देशातील आघाडीची औषधनिर्माण कंपनी ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ या कंपनीचे मालक आहेत. तीन दशकांपूर्वी संजीव जैन आणि संदीप जैन हे भावंड आपल्या कुटुंबियांसोबत दिल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, आजच्या घडीला त्यांची कंपनी ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ ही देशातील सर्वात मोठी औषधनिर्माण कंपनी बनली आहे.
हेही वाचा : एलआयसीचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावले तब्बल 45000 कोटी रुपये!
छोट्या दुकानापासून सुरुवात
संजीव जैन आणि संदीप जैन यांचे वडील 1961 साली रोहतक येथून दिल्लीला राहण्यासाठी आले होते. दोघा भावांनी आपले १०वी, १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही धंद्यात उतरण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एक छोटे औषधांचे दुकान सुरू केले. विशेष म्हणजे दोघाही भावांना त्यात मोठे यश मिळाले. याच दुकानाच्या जोरावर 1991 मध्ये दोघा भावांनी दिल्लीत स्वतःचे घर उभे केले. परिणामी, त्यांना आता आपल्या दुकानाऐवजी औषधनिर्माण कंपनी सुरु करण्याचा विचार मनात आला. त्यानुसार, त्यांनी माहिती मिळवत 2004 मध्ये पहिली कंपनी सुरू केली.
किती आला खर्च?
संजीव जैन आणि संदीप जैन यांनी हरिद्वार येथे आपली पहिली औषधनिर्माण कंपनी सुरु केली. विशेष म्हणजे त्याकाळी हरिद्वार परिसरात विशेष सुविधा देखील नव्हत्या. मात्र, जैन बंधूंनीं हिम्मत करत 1.17 लाख रुपये गुंतवणुकीतून कंपनी उभी केली. त्यासाठी त्यांना आपले घर बँकेकडे गहाण ठेवावे लागले होते. मात्र, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आज त्यांच्या एकूण १५ कंपन्या आहेत. ज्यामध्ये १२ कंपन्या या औषध निर्मिती करतात. तर तीन कंपन्या या सक्रिय फार्मा घटक अर्थात एपीआयमध्ये आहे.
हेही वाचा : …फेसबुक खरेदी करणार ‘ही’ कंपनी; मार्क झुकरबर्ग उतरणार ‘या’ उद्योगामध्ये!
कंपनीबाबत थोडक्यात माहिती
संजीव जैन आणि संदीप जैन यांच्या सर्व कारखान्यात गोळ्या, कॅप्सूलपासून इंजेक्शन, कुपी, ट्यूब मलम इत्यादी सर्व काही बनते. जैन बंधू सांगतात, सध्या त्यांचे कारखाने 18,000 प्रकारच्या औषधांवर काम करत आहेत. याशिवाय त्यांच्या ग्राहकांची संख्या 1500 क्लायंट्स इतकी आहे. याशिवाय देशातील टॉप 30 फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी 26 कंपन्या या ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ कंपनीच्या ग्राहक आहेत.
१६ हजार जणांना दिलाय रोजगार
संदीप जैन म्हणतात की सध्याच्या घडीला ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ ही देशातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल्स कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग संस्था आहे. इतकेच नाही तर स्वित्झर्लंडचा लोन्झा ग्रुपची एकच कंपनी या क्षेत्रात जगात अधिराज्य गाजवत आहे. त्यानंतर ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ कंपनीचा जगात दुसरा क्रमांकावर आहे. सध्याच्या घडीला जैन यांच्या कंपनीमध्ये एकूण 16,000 लोक काम करत आहे. त्यापैकी 7,000 कायम कर्मचारी आहेत, तर 9,000 जण आउट सोर्स आहेत.