
The figure, standing at 5,000 TEUs on March 1st, dropped to 3,200 TEUs by March 8th.
मध्यपूर्वेतील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा परिणाम भारताच्या आयात-निर्यात व्यापारावर होऊ नये यासाठी जेएनपीएने भागधारकांसोबत समन्वय साधत उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे बंदरातील अडकलेल्या कंटेनरची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली असून १ मार्चला ५,००० टीईयू असलेली संख्या ८ मार्चपर्यंत ३,२०० टीईयूवर आली.
मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे जहाजांच्या वेळापत्रकात बदल झाल्याने निर्यात मालाच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर व्यापारातील अडचणी दूर करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष समन्वय पथक स्थापन केले आहे. या पथकात परकीय व्यापार महासंचालनालय, सीमाशुल्क विभाग तसेच जेएनपीएचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. व्यापाऱ्यांशी आणि निर्यातदारांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी जेएनपीएचे मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) गिरीश थोमस यांची प्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रीफर ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर रेफर तसेच इतर कंटेनर वाहतुकीसाठी पुरेसे ट्रेलर्स उपलब्ध राहतील याची खात्री जेएनपीएतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे बंदरातून कंटेनर बाहेर पडण्याची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. विशेषतः केळी, द्राक्षे यांसारख्या लवकर नाश पावणाऱ्या कृषी मालाच्या कंटेनरची वेळेत व सुरक्षित हाताळणी करण्यावर भर दिला जात आहे.