देशातील 'या' 7 शहरांमध्ये विकली जातायेत सर्वाधिक महागडी घरे; किंमतीत 23 टक्क्यांनी वाढ!
सध्याच्या घडीला देशात महागाई वाढल्याने, सामान्यांना आर्थिक बजेट सांभाळणे देखील मुश्किल आहे. देशातील महागाईचा परिणाम हा कांदा आणि टोमॅटोच्या भावावरच नाही तर घरांच्या किमतीवरही दिसून येत आहे. देशात घरांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या सहामाहीत देशातील टॉप 7 शहरांमधील घरांची सरासरी किंमत 23 टक्क्यांनी वाढून, 1.23 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष 24 च्या पहिल्या सहामाहीत 7 शहरांमधील घरांची सरासरी किंमत ही 1 कोटी रुपये इतकी होती. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
आलिशान घरांच्या मागणीत वाढ
ॲनारॉक ग्रुपच्या आकडेवारीनुसार, कोरोना काळानंतर लक्झरी घरांच्या वाढत्या मागणीमुळे या शहरांमध्ये नवीन लॉन्च आणि महागड्या घरांची विक्री किंमत उच्चांकी झाली आहे. या अहवालानुसार, देशातील टॉप 7 शहरांमध्ये एनसीआरमधील घरांच्या किमती वार्षिक आधारावर 55 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या सहामाहीत ते 1.45 कोटी रुपये होते. जे आर्थिक वर्ष 24 च्या पहिल्या सहामाहीत 93 लाख रुपये इतके नोंदवले गेले होते.
(फोटो सौजन्य – istock)
सर्वाधिक महागडी घरे कोणत्या शहरात?
कर्नाटकची राजधानी बंगळुरूने देशातील सर्वाधिक महागड्या घरांच्या टॉप 7 शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असे अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत महागड्या घरांच्या किंमती 84 लाख रुपयांवरून, 2025 च्या पहिल्या सहामाहीत 1.21 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत शहरात 26,274 कोटी रुपयांच्या सुमारे 31,440 युनिट्सची विक्री झाली आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत सुमारे 31,381 युनिट्स विकल्या गेल्या. त्यांचे एकूण मूल्य 37,863 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
हैदराबादमध्ये सर्वाधिक महागडी घरे
आर्थिक वर्ष 24 च्या तुलनेत 25 मध्ये हैदराबादमधील घरांच्या सरासरी किमती 37 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अर्थात 84 लाख रुपयांवरून 1.15 कोटी रुपयांपर्यंत हैद्राबादमध्ये घरांच्या किंमती वाढल्या आहेत. चेन्नईमध्ये घरांच्या किंमती 31 टक्क्यांनी वाढत, त्या 72 लाख रुपयांवरून, 95 लाख रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. पुण्यात घरांच्या किंमतीत 31 टक्क्यांनी वाढ होऊन, त्या 66 लाख रुपयांवरून 85 लाख रुपये इतकी वाढ झाली आहे. तर कोलकाता या ठिकाणी घरांच्या किंमतीत 16 टक्क्यांनी वाढ होऊन, ती 53 लाख रुपयांवरून, 61 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे.
काय आहे एमएमआर परिसरातील परिस्थिती?
ॲनारॉक ग्रुप अहवालानुसार, मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) घरांच्या सरासरी किंमतीत गेल्या वर्षभरात कोणतीही वाढ झालेली नाही. तो 1.47 कोटी रुपये झाला आहे. ॲनारॉक ग्रुपचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले आहे की, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशातील टॉप 7 शहरांमध्ये 2,27,400 युनिट्सची विक्री झाली आहे. ज्याची किंमत 2,79,309 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 2,35,200 युनिट्सची विक्री झाली होती. ज्यांचे मूल्य 2,35,800 कोटी रुपये होते. ते पुढे म्हणाले आहे की, एकूण युनिट विक्रीत 3 टक्के घट झाली असली तरी, एकूण विक्री किंमत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 18 टक्क्यांनी जास्त आहे. यावरून देशात लक्झरी घरांची मागणी वाढत असल्याचे दिसून येते.