जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमनच्या सॅक्सच्या अहवालामुळे व्होडाफोन आयडिया टेलिकॉम कंपनीचे शेअर्स सुमारे 14 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे आता ब्रोकरेज फर्म गोल्डमनने व्होडाफोन आयडियाच्या स्टॉकची लक्ष्य किंमत 2.5 रुपये कमी केली आहे. यामुळे शुक्रवारच्या व्यवहारात कंपनीचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) 12.92 रुपये आणि मुंबई शेअर बाजारात 12.91 रुपयांपर्यंत कोसळला. ज्यात आज दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत काहीशी सुधारणा होऊन, तो १३.४३ रुपयांवर व्यवहार करत होता. दरम्यान, गुरुवारी आयडिया टेलिकॉम कंपनीचा हा शेअर १५.०९ रुपयांवर बंद झाला आहे.
हे देखील वाचा – इन्फोसिसप्रकरणी चौकशी करण्याचे केंद्राचे कर्नाटक सरकारला आदेश; वाचा… काय आहे प्रकरण!
शेअर 2.5 रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता
गोल्डमनच्या सॅक्सच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, व्होडाफोन-आयडिया या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होऊन, तो तब्बल 2.5 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, व्होडाफोन आयडियाच्या स्टॉकमध्ये पुढील 3 ते 4 वर्ष कोणतीही सुधारणा होणार नाही. बाजारातून पैसे उभे करण्यासाठी कंपनीने अलीकडेच आपला एफपीओ (फॉलो ऑन पब्लिक ऑफर) सादर केला होता. याशिवाय प्रवर्तकांनी त्यात भांडवलही गुंतवले होते. यामुळे कंपनीला 20,100 कोटी रुपये मिळाले आहे. याशिवाय कंपनीने 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारीही केली आहे. कंपनीच्या एफपीओ दरम्यान, गोल्डमन सॅक्सने प्रत्येकी 11 रुपये दराने सुमारे 81 लाख शेअर्स घेतले होते. आता ब्रोकरेज फर्मने असा अहवाल दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
काय म्हटलंय ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात
ब्रोकरेज फर्मने गोल्डमनने आपल्या अहवालात म्हटले आहे की, व्होडाफोन आयडियाला या कंपनीला आर्थिक वर्ष 2026 पासून मोठ्या प्रमाणात एजीआर आणि स्पेक्ट्रम संबंधित पेमेंट करावे लागतील. दुसरीकडे, कंपनीला सरकारकडे काही देय रक्कम इक्विटीमध्ये रूपांतरित करावी लागणार आहे. व्होडाफोन आयडियाला मध्यम मुदतीत मोफत रोख प्रवाह सकारात्मक असण्याची शक्यता कमी आहे. गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2031 पर्यंत विनामूल्य रोख प्रवाह सकारात्मक होण्याची शक्यता कमी दिसते. कंपनीला आर्थिक वर्ष 2027 पर्यंत एआरपीयू (Average Revenue Per User)मध्ये अंदाजे 2.5 पट वाढ करावी लागेल. जर कंपनी हे करण्यात यशस्वी झाली तर ती मुक्त रोख प्रवाह तटस्थ पातळीवर आणण्यास सक्षम असणार आहे, असेही ब्रोकरेज फर्मने गोल्डमनने म्हटले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)