ज्या कॉलेजने प्रवेश नाकारला, त्याच कॉलेजने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले, वाचा... गौतम अदानी यांच्या शालेय जीवनातील रंजक किस्सा
तुम्ही अनेक आदर्श व्यक्ती किंवा उद्योगपतींच्या यशोगाथा एेकल्या असतील, वाचल्या असतील. आज आम्ही तुम्हांला भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या आयुष्यातील रंजक कहाणीबाबत सांगणार आहोत. विशेष म्हणजे त्यांची ही कहाणी विद्यार्थी दशेतील असून, त्यांना शाळेत प्रवेश न मिळण्याबाबतची आहे. गौतम अदानी यांनी १९७० च्या दशकात शिक्षणासाठी मुंबईतील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता. मात्र, या कॉलेजने त्यांना प्रवेश नाकारला होता. विशेष म्हणजे यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण थांबवत ते बिझनेसकडे वळाले. आज त्यांचे नाव जागतिक पातळीवर सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर तर भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विक्रम नानकानी यांनी दिला आठवणींना उजाळा
५ सप्टेंबर २०२४ रोजी देशभरातील शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच शिक्षक दिनी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना प्रवेश नाकारणाऱ्या याच कॉलेजने विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यापुर्वी विद्यार्थ्यांच्या संघाचे अध्यक्ष विक्रम नानकानी यांनी हा रंजक किस्सा सांगितला. नानकानी यांनी सांगितले की, 1977-1978 मध्ये गौतम अदानी हे १६ वर्षाचे असताना, त्यांनी मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, या दुर्देवाने जय हिंद कॉलेजने त्यावेळी त्यांना प्रवेश नाकारला होता. विशेष म्हणजे गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद हे त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.
काही काळ हिरे व्यवसायात केले काम
यावेळी नानकानी यांनी म्हटले आहे की, गौतम अदानी हे जय हिंद कॉलेजचे माजी विद्यार्थी राहिले आहेत. मात्र, दुर्देवाने कॉलेजने त्यावेळी त्यांना प्रवेश नाकारला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायात पुर्ण क्षमतेने झोकून देत काम करणे सुरु केले. त्यांनी पुढील दोन वर्ष मुंबईत हिरा निर्मिती व्यवसायात काम केले. त्यानंतर ते काही काळ गुजरातला गेले. तिथूनच त्यांच्या व्यावसायिक यशाचा आलेख उंचावत गेला. असेही त्यांनी म्हटले आहे.
१९९८ पासून विस्तारला हळूहळू व्यवसाय
गौतम अदानी यांनी १९९८ मध्ये वस्तूंचा व्यापार करणारी एक कंपनी स्थापन केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी हळूहळू बंदरे, खाणी, बांधकाम, वीज, शहरी गॅस, नवीकरणीय उर्जा, सिंमेट उद्योगामध्ये आपले स्थान निर्माण केले. आज गौतम अदानी यांचे नाव जागतिक पटलावर झळकत आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार शेजारील देशांसह आशियाभरात पसरला आहे.
मी तेव्हाच पहिली सीमा ओलांडली होती
‘ब्रेकिंग बाउंड्रीज: द पॉवर ऑफ पॅशन अँड अनकन्वेंशनल पाथ्स टू सक्सेस’ या विषयावर बोलताना गौतम अदानी म्हणाले की, ते 16 वर्षांचे असताना त्यांनी पहिली सीमा तोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अभ्यास सोडून व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यावेळी गौतम अदानी यांनी सांगितले आहे की, मला बरेच लोक विचारतात, “तू मुंबईला गेला होतास?” तू तुझे शिक्षण का पूर्ण केले नाहीस?’ त्यावर आपले उत्तर हेच असते की, या शहरात काहीतरी करण्याची हिंमत आहे. व्यवसायासाठी मुंबई हे माझे प्रशिक्षण ठिकाण होते. इथे मी व्यवसाय शिकलो. मुंबईनेच मला मोठा विचार करायला शिकवले. तुमच्या मर्यादेपलीकडे स्वप्न पाहण्याचे धैर्य तुमच्यात असले पाहिजे. हे मला मुंबईने शिकवले, असेही त्यांनी म्हटले आहे.