टोमॅटोला मिळतोय 100 ते 120 रुपये प्रति किलो उच्चांकी भाव; उत्पादक शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. ज्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. अशातच आता टोमॅटोच्या दरात दिवसेंदिवस आणखी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. देशातील प्रमुख महानगर असलेल्या मुंबईमध्ये तर टोमॅटोच्या दराने नव्याने शतकोत्तर वाटचाल सुरु केली आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये देखील टोमॅटोचा दर शतकी आकड्याकडे झेपावतो आहे. परिणामी, सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. तर ग्राहक मात्र, टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
किती मिळतोय टोमॅटोला दर?
मुंबईमध्ये टोमॅटोला सध्या प्रति किलो 100 ते 120 रुपये दर मिळत आहे. ज्यामुळे ग्राहकांना सध्या टोमॅटोशिवाय अन्य भाजीपाल्याकडे मोर्चा वळवावा लागतो आहे. तर अनेक हॉटेल चालकांनी आपल्या थाळीमधून टोमॅटोला ‘आउट’ केले आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीमधील देखील टोमॅटोचे दर १०० रुपये प्रति किलोच्या दिशेने झेपावत असून, सध्या त्या ठिकाणी टोमॅटोला प्रति किलो 90 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत आहे.
काय आहेत प्रमुख शहरांमधील दर?
मुंबई : 100 ते 120 रुपये प्रति किलो
दिल्ली : 90 रुपये प्रति किलो
मुरादाबाद : 70 ते 80 रुपये किलो
मेरठमध्ये : 80 रुपये किलो
गाझीपूर : 80 रुपये किलो
चंदीगड : 50 रुपये किलो
टोमॅटो पुरवठा साखळीवर परिणाम
मागील आठवडाभर देशातील सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. परिणामी, सर्वच भागांमध्ये टोमॅटो पुरवठा साखळीवर परिणाम दिसून आला. बाजारात पुरवठा कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम सध्या प्रमुख महानगरांमधील टोमॅटो दरांवर दिसून येत आहे. ज्यामुळे या आठवड्यात ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. मुसळधार पावसाचा कर्नाटक, हिमाचल आणि महाराष्ट्र यांसारख्या टोमॅटो उत्पादक राज्यांमधून उत्तरेकडे जाणाऱ्या ट्रकवर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे. आठवडाभरात उत्तर भारतीय राज्यांमध्ये टोमॅटोचे दर 60 ते 70 रुपयांवर पोहोचले आहेत.