
'ही' आहेत जगातील टॉप 10 महागडी घरे; वाचा... मुकेश अंबानींच्या 27 मजली अँटिलिया हाऊसचा क्रमांक!
भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मुंबईत जाणाऱ्या प्रत्येकालाच त्यांच्या अँटिलिया या मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर स्थित असलेल्या आलिशान घराचे आकर्षण असते. अंबानी यांचे अँटिलिया हाऊस पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते. मात्र, अँटिलिया हाऊस हे भारतातील सर्वात महागडे आलिशान घर असले तरी जगातील सर्वात महागडे आलिशान घर म्हणून यूनाइटेड किंगडमच्या बकिंघम पॅलेसची ओळख आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वाधिक टॉप १० घरांबाबत जाणून घेणार आहोत…
जगातील टॉप १० महागडी घरे
बकिंघम पॅलेस : लंडनमध्ये गेल्या अनेक शतकांपासून बांधलेले हे घर युनायटेड किंगडमच्या राज घराण्याची मालमत्ता आहे. हे ब्रिटिश साम्राज्याच्या अभिमानाचे प्रतीक आहे. बकिंघम पॅलेस हे 1703 मध्ये बांधले गेले. त्याची किंमत 490 कोटी डॉलर एवढी आहे. येथील बागा, सुरक्षा रक्षक आणि बाल्कनी खूप प्रसिद्ध आहेत. दरवर्षी लाखो देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी भेट देतात.
अँटिलिया हाऊस : मुकेश अंबानी यांनी मुंबईत अँटिलिया हाऊस हे 27 मजली घर बांधले आहे. त्याची किंमत 200 कोटी डॉलर एवढी आहे. या घरात 3 हेलिपॅड, 168 कार गॅरेज, स्विमिंग पूल, थिएटर आणि स्नो रूम देखील आहे. हे घर बांधण्यासाठी आणि सजवण्यासाठी जगातील सर्वात महागड्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. हे घर सुमारे 4 लाख स्क्वेअर फूटमध्ये विस्तारलेले आहे.
विला लियोपोल्ड : विला लियोपोल्ड हे घर बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा याने बांधले होते. फ्रेंच रिव्हिएरामधील Villefranche sur Mer येथे असलेल्या या घराशी संबंधित अनेक कथा आहेत. पहिल्या महायुद्धात लष्करी रुग्णालय म्हणूनही याचा वापर करण्यात आला होता. सध्या व्हिला लिओपोल्डचा वापर संग्रहालय म्हणून केला जात आहे. त्याची किंमत 75 कोटी डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.
विला ले सेद्रे : विला ले सेद्रे हे घर फ्रेंच रिव्हिएरावर स्थित असून, ते 1830 मध्ये बांधले गेले. हे किंग लिओपोल्ड दुसरा यांनी 1904 मध्ये खरेदी केले होते. त्याची किंमत 45 कोटी डॉलर असल्याचे सांगितले जात आहे. काँगोमधून कमावलेली संपत्ती तो येथे ठेवत असे. येथील ग्रंथालय खूप प्रसिद्ध आहे.
ले पाले बुल्स : फ्रान्समधील कान्सजवळ बांधलेले आणि बबल पॅलेस म्हणून ओळखले जाणारे हे घर 1989 मध्ये बांधून पूर्ण झाले. हे फ्रेंच व्यापारी पियरे बर्नार्ड यांच्यासाठी बांधले गेले होते. यानंतर फॅशन डिझायनर पियरे कार्डिन यांनी याचा वापर सुरू केला. त्याची किंमत 42 कोटी डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.
ओडियन टावर पेंटहाउस : मोनॅकोजवळ हे आलिशान घर 2015 मध्ये बांधण्यात आले होते. त्याची किंमत सुमारे 33 कोटी डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. येथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.
फोर फेयरफील्ड पॉन्ड : लाँग आयलंड, न्यूयॉर्क येथे असलेल्या या घराची किंमत अंदाजे 250 दशलक्ष डॉलर आहे. ते 2003 साली बांधून पूर्ण झाले. यात 29 बेडरूम आणि 39 बाथरूम आहेत. त्याची मालक इरा रेनार्ट आहे.
18-19 केनसिंगटन गार्डेंस : लंडनमध्ये बांधलेल्या या घराची किंमत सुमारे 220 दशलक्ष डॉलर्स आहे. १८४० साली बांधलेला हा बंगला पूर्वी केन्सिंग्टन पॅलेस मैदानाचा भाग होता. त्यात सर्व लक्झरी सुविधा आहेत. त्याच्या वास्तुकलेची जगभरात प्रशंसा होत असते.
बेयोंसे अँड जे जी : हे संगीत उद्योगातील मोठ्या नावांच्या मालकीचे आहे. बेयॉन्से आणि जे जी. हे लक्झरीसाठी ओळखले जाते. या घराची किंमत अंदाजे 20 कोटी डॉलर्स आहे. हे अमेरिकेतील मालिबू येथे आहे.
द एलिसन एस्टेट : ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक लॅरी एलिसन यांच्या या घराची किंमत सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स आहे. हे वुडसाइड, कॅलिफोर्निया येथे स्थित आहे. त्याची वास्तुकला जपानपासून प्रेरित आहे. येथील बागा पाहण्यासारख्या आहेत.