भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याने शेअर बाजारावर काय होईल परिणाम? काय सांगतात जागतिक संकेत? (फोटो सौजन्य - Pinterest)
Share Market Marathi News: जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा विक्रम करून भारताने इतिहास रचला आहे. देश नवीन उंचीवर पोहोचल्याच्या या बातमीचा परिणाम आठवड्याच्या पहिल्या व्यवसाय दिवशी, सोमवारी शेअर बाजारावर दिसून येतो आहे. गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या प्रमाणात तेजीसह बंद झाले आणि जागतिक संकेत असे दर्शवित आहेत की अर्थव्यवस्थेबद्दलच्या या चांगल्या बातमीचा अनुकूल परिणाम शेअर बाजारावर दिसून येऊ शकतो.
भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याच्या वृत्तानंतर आज सोमवारी सकाळी शेअर बाजार तेजीसह उघडला. बीएसईचा ३० शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स २०७ अंकांच्या वाढीसह ८१९२८ वर उघडला. तर, एनएसईचा ५० शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी ६६ अंकांच्या वाढीसह २४९१९ वर उघडला. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्यावर गुंतवणूकदारांच्या भारतीय बाजाराकडून आशा वाढल्या आहेत.
भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक संकेत देत आहे, यासोबतच जपानला मागे टाकून चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा परिणामही बाजारावर स्पष्टपणे दिसून येतो. आशियाई शेअर बाजारांबद्दल बोलायचे झाले तर, जपानच्या निक्केई निर्देशांकापासून ते दक्षिण कोरियाच्या कोस्पीपर्यंत, सर्वच निर्देशांक सुरुवातीला सुमारे एक टक्क्याच्या वाढीसह व्यवहार करताना दिसले, तर दुसरीकडे गिफ्ट निफ्टी १०५ अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.
भारताचे नाव सद्या संपूर्ण जगात चर्चेत आहे, भारत आता जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ही माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी शेअर केली. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या १० व्या बैठकीनंतर ते म्हणाले, ‘जागतिक आणि आर्थिक वातावरण भारतासाठी अनुकूल आहे आणि मी बोलतो तसे, आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आज आपण ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत.
नीती आयोगाच्या बैठकीनंतर, सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, आता भारतीय अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. भारताने हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे आणि आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहेत. सुब्रमण्यम पुढे म्हणाले की, जर आपण आपल्या योजनेवर ठाम राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आपण जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू.
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात बरीच उलथापालथ झाली होती, परंतु शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, शुक्रवारी, दोन्ही शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी वादळी वाढीसह ग्रीन झोनमध्ये बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई सेन्सेक्स) ३० शेअर्सचा सेन्सेक्स ७६९.०९ अंकांच्या वाढीसह ८१,७२१.०८ वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक (एनएसई निफ्टी) दिवसभर तेजीच्या ट्रेंडमध्ये व्यवहार केल्यानंतर २४३.४५ अंकांनी वाढून २४,८५३.१५ वर बंद झाला.