मागील 20 वर्षाचा काळ, 6 कुंभमेळे आणि प्रत्येक वेळी भारतीय शेअर बाजारात पडझड, नेमके कनेक्शन काय?
आज प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. कित्येक साधू संतांच्या आगमनाने प्रयागराज आता फुलले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आता कुंभमेळ्यावकडे आहे. यामुळे प्रयागराजमधील उद्योगांना देखील चांगली चालना मिळणार आहे. पण तुम्ही कधी नोटीस केले आहे का जेव्हा कधी कुंभमेळ्याचे आयोजन होते, तेव्हा भारतीय शेअर बाजारात पडझड झालेली दिसते.
प्रयागराजमध्ये ४५ दिवस चालणाऱ्या महाकुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या काळात, सुमारे ४० कोटी लोक संगम किनाऱ्यावर डुबकी मारतील. या काळात सेन्सेक्स देखील घसरू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 20 वर्षांत जेव्हा जेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा तेव्हा शेअर बाजाराची स्थितीही बिघडते. गेल्या दोन दशकांत कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्सने कधीही सकारात्मक परतावा दिलेला नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गेल्या २० वर्षांत, कुंभमेळा ६ वेळा आयोजित करण्यात आला आहे आणि प्रत्येक वेळी, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, सेन्सेक्सचा परतावा नकारात्मक असल्याचे दिसून आले. कुंभमेळा अंदाजे 52 दिवस चालतो आणि या काळात सेन्सेक्समध्ये सरासरी 3.42 टक्क्यांची घसरण झाली आहे. SAMCO सिक्युरिटीजचे अपूर्व शेठ यांच्या विश्लेषणानुसार, गेल्या 20 वर्षांत झालेल्या सहा कुंभमेळ्यांमध्ये, सेन्सेक्सने प्रत्येक वेळी नकारात्मक परतावा दिला आहे.
उदाहरणार्थ, 2021 मध्ये, 1 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. 18 दिवसांच्या या कालावधीत सेन्सेक्स 4.16 टक्क्यांनी घसरला होता. 2015 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. 14 जुलै ते 28 सप्टेंबर दरम्यान झालेल्या या मेळ्यात 8.29 टक्क्यांची घट झाली. त्याचप्रमाणे, 5 एप्रिल ते 4 मे 2004 या कालावधीत झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्स 3.29 टक्क्यांनी घसरला होता.
या ब्रोकरेज फर्मने एका नोटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा बाजार वेगाने पुढे जात असते, तेव्हा अनेक वेळा लोकं अधिक आणि जलद नफा मिळविण्यासाठी त्यांचे शेअर्स विकण्याची घाई करतात. या काळात चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. शेअर बाजारात सुधारणा किंवा घसरण होईपर्यंत हे लक्षात येत नाही.
कंपनीने पुढे म्हटले आहे की, कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्सची कामगिरी तितकीशी चांगली नसली तरी ती कुंभमेळा संपल्यानंतर बाजारात तेजी दिसून येते. कुंभ संपल्यानंतर सहा महिन्यांनी, सेन्सेक्सने सहापैकी पाच प्रकरणांमध्ये सकारात्मक परतावा दिला आहे, सरासरी ८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
अर्पुव पुढे म्हणतात की, कुंभमेळ्यादरम्यान या पडझडीचे अनेक कारणे असू शकतात, जसे की या काळात मोठ्या संख्येने लोकं अनेक दिवसांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही गोष्टींचा वापर वाढतो, तर अनेक गोष्टींचा वापर कमी होतो. काही क्षेत्रांमध्ये फायनान्शियल अॅक्टिव्हिटीज तात्पुरते वाढतात, तर अनेक क्षेत्रांमध्ये याच अॅक्टिव्हिटीज लक्षणीयरीत्या कमी होतात. हे तात्पुरती पॅटर्न बाजारातील घसरणीसाठी जबाबदार असू शकते कारण या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये जोखीम टाळण्याची भावना निर्माण होते