फोटो सौजन्य- iStock
पुढील आठवड्यात झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहे. गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा खुल्या शेअर विक्रीसाठी प्रति शेअर 259 रुपये ते 273 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. कंपनीच्या विक्रीस काढण्यात आलेल्या प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 1 रुपये आहे.
किती गुंतवणूक करणे आवश्यक
झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ बुधवारी, 13 नोव्हेंबर 2024 रोजी खुला होणार आहे. तर सोमवारी 18 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होणार आहे. इच्छुक गुंतवणूकदार किमान 54 शेअर्सच्या लॉट साठी व त्यापुढे 54 समभागांच्या पटीत गुंतवणुकीसाठी बोली लावू शकणार आहेत. आयपीओ विक्रीत सुमारे 550 कोटी रुपये, मूल्याच्या फ्रेश इश्यूचा व प्रमोटर आणि इनव्हेस्टर शेअरहोल्डर्स कडून विक्रीस काढण्यात आलेल्या 20,685,800 समभागांचा समावेश आहे. कंपनी आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रतिसमभाग 25 रुपये सवलत देउन समभाग देऊ करणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
कुठे वापरला जाणार आयपीओचा निधी
झिंका लॉजिस्टिक्स ही कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या भांडवलापैकी 200 कोटी रुपये विक्री व पणन खर्चासाठी वापरणार आहे. तसेच कंपनी आपल्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्याकरता आपल्याकडील भांडवलाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी कंपनी आपल्या आयपीओतून मिळालेल्या उत्पन्नापैकी 140 कोटी रुपये ब्लॅकबक फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गुंतवणार आहे. तसेच प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे उत्पादन विकास कार्यासाठी तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी मिळून कंपनी 75 कोटी रुपये खर्च करणार आहे.
हे देखील वाचा – 20 नोव्हेंबरला शेअर बाजार बंद राहणार; ‘या’ कारणामुळे शेअर बाजाराला असेल सुट्टी!
काय काम करते ही कंपनी
झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड ही भारतातील ट्रक चालकांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्घ करुन देणारी ग्राहक संख्येच्या तुलनेत सर्वात मोठी कंपनी आहे. 2024 या आर्थिक वर्षात या कंपनीच्या माध्यमातून देशभरात 963,345 ट्रक चालकांनी व्यवसाय केला. हे प्रमाण देशातील एकूण ट्रक चालकांच्या संख्येच्या 27.52 टक्के इतके आहे.
झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीची आयपीओ ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्बारा करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्हताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात क्यूआयबी संस्थांना एकूण ऑफर पैकी 75 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग तर किरकोळ गुंतवणूकदारांना १० टक्क्यांपेक्षा अधिक समभाग उपलब्ध केले जाणार नाही.
कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती
30 जून 2024 रोजी समाप्त तिमाहित चालू प्रचालनातून कंपनीला रु. 92.17 कोटी महसूल व त्यावर रु. 28.67 कोटी करोत्तर नफा (पीएटी) मिळाला आहे. झिंका लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स लिमिटेड कंपनीच्या आगामी आयपीओचे रनिंग लीड मॅनेजर म्हणून ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शिअल लिमिटेड आणि आयआयएफल कॅपिटल सर्व्हीसेस लिमिटेड या कंपन्या काम पाहत आहेत. तर केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड कंपनी आयपीओ रजिस्ट्रार म्हणून काम पाहत आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)