फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांना घरबसल्या शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विद्यापीठाशी संबंधित ५६ अधिसूचित सेवा आता ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव अशोक मांडे, सहसचिव संतोष खोरगडे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू व अधिकारी उपस्थित होते. या सेवांचे सादरीकरण अनुप बाणाईत यांनी केले.
या ५६ सेवांपैकी २० सेवा थेट विद्यापीठाशी संबंधित असून, राज्यातील जवळपास २० लाख विद्यार्थी यांचा लाभ घेऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांना या सेवा लवकर मिळाव्यात यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर राईट टू सर्विस (RTS) या टॅबखाली माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यापीठांनी आलेल्या अर्जांची पडताळणी करून निश्चित मुदतीत सेवा द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना सुलभता मिळावी म्हणून प्रत्येक महाविद्यालयात एका पदनिर्देशित अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्ज कसा करावा यासाठी मार्गदर्शक सूचना देखील पोर्टलवर देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून या सेवा अर्जित करू शकतात. पोर्टलवर प्रत्येक विद्यापीठाचा डेटा उपलब्ध असेल, ज्यामध्ये किती अर्ज आले, किती प्रलंबित आहेत व कितीवर कार्यवाही झाली आहे, याची सविस्तर माहिती पाहता येईल.
कुलगुरूंनी या सेवांचा आढावा दर आठवड्याला घेणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी नमूद केले. तसेच, बनावट प्रमाणपत्रांवर आळा घालण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी विद्यापीठांनी तातडीने करावी, असेही ते म्हणाले. पुढे कोणतेही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून फक्त ऑनलाइन सेवा दिली जाणार असून, त्याबाबतची माहिती एसएमएसद्वारे विद्यार्थ्यांना कळवली जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, पारदर्शकता व कार्यक्षमता वाढणार आहे. शिक्षण क्षेत्रातील ही डिजिटल क्रांती विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.