
फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) यांनी डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ४० रिक्त पदे भरली जाणार असून, विशेष बाब म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट GATE 2025 च्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.
ही भरती विशेषतः सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी एक उत्तम संधी मानली जात आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रतिष्ठित संस्थेमध्ये स्थिर आणि सन्मानजनक नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देशभरातील विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार असून, यामुळे त्यांना व्यावहारिक अनुभवासह करिअरमध्ये मोठी वाढ साधता येणार आहे.
NHAI डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ९ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना NHAI च्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर जावे लागेल. अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असणे बंधनकारक आहे. यासोबतच उमेदवाराकडे GATE 2025 चे वैध स्कोअरकार्ड असणे आवश्यक आहे. GATE स्कोअर नसलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे. डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदासाठी उमेदवाराचे वय कमाल ३० वर्षे असावे. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच दिव्यांग उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.
या भरतीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निवड प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. उमेदवारांना कोणतीही लेखी किंवा ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार नाही. GATE 2025 मधील गुणांच्या आधारे थेट मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. गरज भासल्यास कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणीही घेतली जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-१० अंतर्गत दरमहा ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये इतके वेतन दिले जाईल. यासोबतच महागाई भत्ता, प्रवास भत्ता तसेच केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर अनेक सुविधा मिळणार आहेत.