फोटो सौजन्य - Social Media
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम पायाभूत धोरण असून, या धोरणामुळे विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा मिळणार आहे. त्यातून देशाच्या सर्वांगीण प्रगतीत विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या थोर विभूतींनी येथे शिक्षण घेतले आहे. या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढे नेत नवस्नातकांनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
२१व्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’ हे शिकण्यावर भर द्यावा, असे नमूद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक, समावेशक आणि आनंददायी होईल. विज्ञानासोबतच कला, क्रीडा, संस्कृती आणि मूल्यशिक्षणाचा समावेश झाल्याने सर्वांगीण विद्यार्थी घडतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, शिक्षकांना सक्षम करणे आणि शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्तींना आकर्षित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रमुख पाहुणे डॉ. अजय कुमार सूद यांनी कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रम हेच देशाच्या प्रगतीचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापन, संकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रमामुळे देशातील लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
या दीक्षान्त समारंभात पदवी व पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ८४ हजार ३१८ मुले आणि ८८ हजार २०२ मुलींचा समावेश आहे. तसेच ६०२ विद्यार्थ्यांना पी.एचडी पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या १९ विद्यार्थ्यांना २१ पदके प्रदान करण्यात आली.
दीक्षान्त समारंभानंतर विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका व क्रेडिट्स डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया विद्यापीठामार्फत सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.






