
फोटो सौजन्य - Social Media
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रिंकू हुड्डा, प्रसिद्ध भारतीय पॅरा अॅथलीट आणि २०२५ जॅव्हलिन वर्ल्ड चॅम्पियन, यांनी उपस्थिती दर्शवली. आपल्या प्रेरणादायी भाषणातून त्यांनी अडचणींवर मात करत यश मिळवण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि शिक्षणासोबतच आत्मविश्वास, सातत्य व मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच केईएफचे माजी विद्यार्थी आणि कार्यक्रमाचे मुख्य अतिथी विशाल नेवगे, सहाय्यक आयुक्त, राज्य कर (GST विभाग), महाराष्ट्र सरकार, यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वतः केईएफच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन शासकीय सेवेत यशस्वी वाटचाल करणाऱ्या विशाल नेवगे यांच्या अनुभवकथनामुळे विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कला कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणांतून विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक नव्हे, तर कलात्मक, सर्जनशील आणि नेतृत्वगुणांचाही प्रत्यय आला. शिष्यवृत्ती प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. संपूर्ण सभागृहात उत्साह, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.
या सोहळ्याला केईएफ व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य गणेश राजा (मुख्य कार्यकारी अधिकारी ,CEO), जयश्री रमेश (मुख्य कार्यकारी अधिकारी, एज्युकेशन) आणि कविता शांघवी (संचालक, एज्युकेशन) यांची विशेष उपस्थिती होती. केईएफच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्यविकास आणि मार्गदर्शन यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ‘राईज २०२५’ हा केवळ शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम नसून, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवी दिशा देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.