फोटो सौजन्य - Social Media
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार, सन २०२५-२६ पासून इयत्ता पहिलीत कार्य शिक्षणाच्या विषयांतर्गत कृषी अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम टप्प्या-टप्प्याने इयत्ता दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल.
या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे वरिष्ठ प्राध्यापक सहभागी झाले होते. डॉ. भोयर म्हणाले की, बालकांचे कार्य शिक्षण विषय व २१व्या शतकातील कौशल्ये याबरोबरच कृषी, पर्यटन आणि व्यावसायिकतेचे पायाभूत शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
शालेय अभ्यासक्रमात भारतीय संस्कृती आणि परंपरेला समृद्ध करण्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कार्यशिक्षण उपक्रमांमध्ये स्थानिक सण, परंपरा, कला, पिके, भौगोलिक रचना आणि उपलब्ध साधन सामग्री यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल जाणीव निर्माण होईल आणि त्यांचे पारंपरिक ज्ञान वाढेल. तसेच, त्यांनी भारतातील शेतीचे महत्त्व, कृषी क्षेत्रातील गुंतवणूक, लोकजीवनातील शेतीचे स्थान, माती, पाणी, नैसर्गिक संसाधने, वनस्पती व स्थानिक पशुपक्षी याबाबत माहिती देण्याचेही सुचविले, जेणेकरून विद्यार्थ्यांना शेती आणि पर्यावरणाशी संबंधित व्यापक ज्ञान प्राप्त होईल.
इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात विविध उपक्रमांचा समावेश केला जाणार आहे. यात परसबाग, सेंद्रिय शेती, तृणधान्य उत्पादन, अन्न प्रक्रिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, बांबूचा वापर, पाळीव प्राणी पोषण, कुक्कुट पालन, पर्यटन व आदरातिथ्य, जल व्यवस्थापनासाठी पाण्याचे लेखापरीक्षण, जैवविविधता नोंदणी, इंधनविरहीत स्वयंपाक यासारखे विषय समाविष्ट केले जातील.
शेतीसारख्या पारंपरिक विषयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनांचा उपयोग शिकविण्यात येईल. यामुळे केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्यांचा व्यावहारिक अनुभवही वाढेल, तसेच त्यांचे कौशल्य अधिक विकसित होईल. या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत आवड निर्माण होईल आणि त्यांनी पर्यावरण, स्थानिक संसाधने व पारंपरिक जीवनशैली यांचा सखोल अभ्यास करता येईल. डॉ. भोयर यांनी हे उपाय शालेय शिक्षणात प्रभावीरीत्या राबवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.