
फोटो सौजन्य - Social Media
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या अधिपत्याखाली पालघर जिल्ह्यातील कांबळगाव (ता. पालघर), चळणी (ता. डहाणू), सवणे (ता. तलासरी), शेंडेगाव (ता. शहापूर), पळसुंडे व हिरवे (ता. मोखाडा) येथील एकलव्य निवासी शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निवासी स्वरूपात आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण तसेच सहशालेय उपक्रमांची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य शाळा शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा पर्याय ठरत आहेत.
या प्रवेश परीक्षेसाठी डहाणू, तलासरी, पालघर व वसई तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच शासनमान्य शाळांमध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. मात्र प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती किंवा आदिम जमातीचा असणे आवश्यक असून त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट घालण्यात आली आहे.
एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे निःशुल्क ठेवण्यात आली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज संबंधित एकलव्य निवासी शाळेतच जमा करावा लागणार आहे. अर्ज मिळण्याची तसेच सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शाळा प्रशासन यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे निवासी शिक्षण, शैक्षणिक प्रगतीसाठी पूरक वातावरण आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एकलव्य शाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे आणि प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी केले आहे.