
फोटो सौजन्य - Social Media
प्री-मॅट्रिक (इयत्ता ९ वी व १० वी) तसेच पोस्ट-मॅट्रिक (इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याकडून करण्यात आले आहे. सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले असून, एनएसपी (National Scholarship Portal) वर अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ही योजना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग व शिष्यवृत्ती विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून अंमलात आणली जात आहे. याच अंतर्गत भारत सरकारच्या पीएम-वायएएसएएसव्हीआय (PM-YASASVI – Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India) या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते.
प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इ. ९ वी व १० वी) साठी लागू प्रवर्ग ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी व एसबीसी असे आहेत. संबंधित शाळा शासनमान्य असणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. किमान ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक ५,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. एका कुटुंबातील दोन मुलांपर्यंत लाभाची मर्यादा असून, मुलींसाठी कोणतीही मर्यादा नाही. पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठीही ओबीसी, व्हीजेएनटी, डीएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत. यासाठीही उत्पन्न मर्यादा २.५ लाख रुपये असून किमान ७५ टक्के उपस्थिती आवश्यक आहे. एफआरए किंवा मान्य प्राधिकरणांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांसाठीच शिष्यवृत्ती देण्यात येईल. शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटीद्वारे थेट आधार-लिंक बँक खात्यात जमा होणार आहे. अभ्यासक्रम मध्येच सोडल्यास मिळालेली शिष्यवृत्ती रक्कम परत करावी लागेल.
विद्यार्थ्यांनी अर्ज https://scholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, जातवैधता (लागू असल्यास), उत्पन्न प्रमाणपत्र, आधार-लिंक बँक खाते, बोनाफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक आणि ७५ टक्के उपस्थितीचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेसाठी योग्य मार्गदर्शन करावे, तसेच कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, असे आवाहनही सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी होणार आहेत. या परीक्षांची प्रवेशपत्रे मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्रांची प्रिंट काढून तात्काळ विद्यार्थ्यांना वितरित करावी, तसेच विद्यार्थी व पालकांनी प्रवेशपत्र शाळेकडून प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.