फोटो सौजन्य - Social Media
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत कार्यरत असलेल्या सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम्स (CABS), बेंगळुरू येथे तरुण आणि पात्र संशोधकांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी एकूण 10 पदे भरली जाणार असून, यासाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना 25 व 26 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या वॉक-इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होता येणार आहे.
या भरतीसाठी उमेदवाराकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेत प्रथम श्रेणीत BE/BTech पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे वैध GATE स्कोअर असणे बंधनकारक आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी फक्त GATE 2024 आणि GATE 2025 या वर्षांतील स्कोअरच ग्राह्य धरले जाणार आहेत. याशिवाय, ज्या उमेदवारांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण दोन्ही स्तरांवर संबंधित शाखेत प्रथम श्रेणीत ME/MTech पदवी पूर्ण केली आहे, असे उमेदवारही या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
वयोमर्यादेच्या दृष्टीने पाहता, 31 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 28 वर्षांपेक्षा अधिक नसावे. मात्र, शासनाच्या नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC – नॉन-क्रीमी लेयर) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू राहील. सर्व उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे वॉक-इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. इंटरव्ह्यूच्या दिवशी प्रथम उमेदवारांच्या अर्जांची आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी (Verification) केली जाईल. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीनंतर उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार एक पॅनल तयार करण्यात येणार असून, हे पॅनल एक वर्षासाठी वैध राहील. सदर पॅनलचा उपयोग सध्याच्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या रिक्त पदांसाठीही करण्यात येणार आहे.
वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम्स (CABS), संरक्षण मंत्रालय, बेलूर, येमलूर पोस्ट ऑफिस, बेंगळुरू – 560037 येथे करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रतींसह वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






