
फोटो सौजन्य - Social Media
शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती, संघभावना आणि नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने सिंदखेड राजा येथील सहकार विद्या मंदिरात ‘क्षतिज’ वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नवनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे आणि गटशिक्षणाधिकारी स्वप्निल निकम यांच्या हस्ते करण्यात आले. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, अध्यक्ष सुकेश झंवर तसेच संस्थेच्या अध्यक्षा कोमल झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि. २२) आणि मंगळवारी (दि. २३) बुद्धीबळ, कॅरम, कबड्डी, क्रिकेट व खो-खो अशा विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्ती, शिस्त आणि संघभावनेचे उत्कृष्ट दर्शन घडवले.
गुरुवारी (दि. २५) पूर्व प्राथमिक ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळ, कवायती आणि सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास बुलढाणा अर्बनचे नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती गणेश झोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संजय मेहेजे, सतीश ठाकरे, गजानन मेहेजे, शाखा व्यवस्थापक उदय कुळकर्णी, प्राचार्य दिनेश इंगळे तसेच क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळवे यांनी केले. या निमित्ताने सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अवघ्या २१ व्या वर्षी नगराध्यक्षपदाचा मान मिळविल्याबद्दल सौरभ तायडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या तरुण नेतृत्वाचे उपस्थितांनी कौतुक केले.
दरम्यान, जिल्ह्यासाठी आणखी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील आवार येथील गुंजकर वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा विवेक लकडे हिची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडीसह अपूर्वाने मानाचा ‘कलर कोट’ देखील पटकावला असून तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. अपूर्वाने क्रिकेट क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनत आणि उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठस्तरीय निवड चाचणीत आपले कौशल्य सिद्ध केले. ग्रामीण भागातील मर्यादित सुविधांवर मात करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने हे यश मिळवले आहे. तिची निवड आगामी आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व गुंजकर एज्युकेशन हबचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अपूर्वाचे अभिनंदन केले आहे. अपूर्वाच्या या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे. तिच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.