३१ केंद्रांवर विद्यार्थी देणार परीक्षा (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा आज (दि.२८) घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३१ परीक्षा केंद्रावर ८ हजार ७७२ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. सदर परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक हे असणार आहेत. बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी हे दोन परीक्षेसाठी विषय असणार आहेत.
बौद्धिक क्षमता चाचणी परीक्षा ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी व सुनिष्ठ प्रश्न असतील. तर शालेय क्षमता चाचणी परीक्षा ही सामान्यतः व इयत्ता सातवी आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान एकूण गुण ३५, समाजशास्त्र एकूण गुण ३५, गणित एकूण गुण २० असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात. सदर परीक्षा शंभर टक्के अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे.
हेदेखील वाचा : अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ! पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्वाची बातमी
दरम्यान, परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रावर येताना निळ्या, काळ्या शाईचा बॉल पेन वापर करावा. सोबत येताना ओळखपत्र, हॉल तिकीट असणे अनिवार्य राहील. परीक्षार्थीनी मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, पेजर, कॅमेरा, डिजिटल डायरी किंवा तत्सम प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य पुस्तके, वह्या कोणत्याही प्रकारची कागदपत्रे प्रवेश पत्राशिवाय परीक्षा केंद्रावर आणण्यास मनाई असेल. परीक्षार्थीनी वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा जोर
राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा जोर विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी त्यांचा सराव घेतला जात आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यामागे शाळा कोणतीही कमतरता पडू देत नाही. अशात अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आल्यामुळे, ज्या शाळांना शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांची अद्याप नोंद केली नाही, त्यांना या वाढलेल्या मुदतीचा चांगलाच लाभ होणार आहे.






