फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा: युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी’ या उपक्रमांतर्गत जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून विवा महाविद्यालय, विरार येथे ‘करिअर संसद’ या अनोख्या उपक्रमाचा पदग्रहण व शपथविधी सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, सहसमन्वयक डॉ. रोहन गवाणकर, करिअर कट्टा समिती सदस्य, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘करिअर संसद’ या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांची बीजे रुजवणे असा आहे. या संसदेमध्ये विद्यार्थ्यांचे एक मंत्रिमंडळ स्थापन करून विविध विभागांच्या कार्यपद्धतीची प्रात्यक्षिके दिली जातात. विद्यार्थी प्रत्यक्षात मंत्री म्हणून काम करताना कौशल्य विकास, उद्योजकता, प्रशासन, शिस्त, प्रसारमाध्यमे, कायदे इ. बाबींचा अनुभव घेतात. केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून करिअर घडवण्याच्या दिशेने ही संसद विद्यार्थ्यांना प्रेरित करते.
करिअर संसदेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची तपासणी करून समन्वयक डॉ. अनुश्री किणी व प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. त्यात मुख्यमंत्री म्हणून चिंतन केळस्कर, नियोजन मंत्री क्रिश राजभार, कायदे व शिस्त मंत्री राजू कुकाली, सामान्य प्रशासन मंत्री सिद्धी गावडे, माहिती व प्रसारण मंत्री कृष्णा पांड्ये, उद्योजकता विकास मंत्री अमित मिश्रा, रोजगार स्वयंरोजगार मंत्री स्वाती सिंघ, कौशल्य विकास मंत्री रिया सिंघ, संसदीय कामकाज मंत्री कांचन गुप्ता, महिला व बालकल्याण मंत्री गायत्री पांड्ये तसेच सदस्य म्हणून गौरव जांगीड, शुभम शॉ व जैनिक पटेल यांचा समावेश आहे. त्यांना प्रमाणपत्र, करिअर डायरी आणि नियुक्तीपत्र प्राचार्यांच्या हस्ते देण्यात आले.
या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय हितेंद्र ठाकूर, सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर व व्यवस्थापन समिती सदस्य संजय पिंगुळकर, श्रीनिवास पाध्ये आणि संजीव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.