फोटो सौजन्य - Social Media
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत मुंबई पोलिसांनी इमारटिकस लर्निंगसोबत भागीदारी करत एक आगळावेगळा प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांच्या गरजा व अपेक्षांच्या अनुषंगाने पोलिसांची सेवा सुधारण्याच्या उद्देशाने, ४० हजार पोलिस कर्मचाऱ्यांना व्यावसायिक व नागरिक-केंद्री कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रशिक्षण उपक्रमाचा उद्देश म्हणजे पोलिस कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणे, नागरिकांच्या समस्या समजून घेऊन योग्य पद्धतीने प्रतिसाद देणे आणि सेवेचा दर्जा वाढवणे. या कार्यक्रमाची सुरुवात निवडक ५०० मास्टर ट्रेनर्सपासून केली जाणार असून, त्यांना पाच दिवसांचे ‘ट्रेन द ट्रेनर’ सत्र दिले जाईल. त्यानंतर हे मास्टर ट्रेनर्स ४० हजार पोलिस कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देतील. या सत्रांच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्यांना तणाव व्यवस्थापन, सुसंवाद, सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद, आणि व्यावसायिक वर्तन यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी शिकविल्या जातील. प्रशिक्षण सुरू करण्याआधी नागरिकांचे आणि पोलिस अधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी एक चर्चासत्र घेतले जाईल. यातून पोलिस व नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने सत्रांची आखणी केली जाईल. प्रशिक्षणानंतर त्याचा प्रभाव मोजण्यासाठी एक प्रभावी मूल्यमापनही राबवले जाईल.
इमारटिकस लर्निंगचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल बारशीकर यांनी सांगितले की, “या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही नागरिक-केंद्री प्रशासनाच्या दिशेने ठोस योगदान देत आहोत. पोलिस कर्मचारी हे प्रशासनाच्या सर्वात अग्रभागी काम करणारे घटक असून, ते नागरिकांशी थेट संवाद साधतात आणि त्यांच्या तक्रारी, अडचणी व गरजांशी रोज सामना करतात. त्यामुळे त्यांची सुसंवाद क्षमता, सहानुभूतीपूर्वक वागणूक आणि तणाव हाताळण्याची कौशल्ये विकसित करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या गतिमान आणि तणावपूर्ण सामाजिक परिस्थितीत पोलिसांवर मोठा मानसिक भार असतो. अशा वेळी त्यांच्या मनोबलात वाढ होण्यासाठी आणि लोकांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी अशा प्रशिक्षणाची नितांत गरज आहे.”
बारशीकर यांनी पुढे सांगितले की, “या उपक्रमामुळे मुंबई पोलिस दल अधिक संवेदनशील, उत्तरदायी आणि आधुनिक पद्धतीने काम करणारे बनणार आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेण्याची आणि त्यावर तत्काळ कारवाई करण्याची क्षमता पोलिसांमध्ये विकसित होईल. परिणामी, नागरिकांचा पोलिस प्रशासनावर असलेला विश्वास अधिक दृढ होईल आणि दोघांमधील परस्पर सुसंवाद वाढेल. हे प्रशिक्षण केवळ कौशल्यविकासापुरते मर्यादित नसून, एक सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठीचे पाऊल आहे, जे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत दीर्घकालीन सुधारणा घडवून आणेल.”