फोटो सौजन्य - Social Media
आंतरराष्ट्रीय जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) यंदा आपला ५० वा वर्धापन दिन साजरा करत असून, त्या निमित्ताने १७ ते १९ एप्रिल २०२५ दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये IGI डी शो 2025 चे आयोजन करत आहे. ही डी शोची २१ वी आवृत्ती असून, भारतातील आणि आंतरराष्ट्रीय डायमंड उद्योगासाठी हा एक महत्त्वाचा व्यासपीठ ठरणार आहे. हे प्रदर्शन देशातील सर्वात मोठे प्रीमियम डायमंड ज्वेलरी इव्हेंट मानले जाते.
IGI डी शो हे हिरे उत्पादक, लक्झरी ब्रँड्स, आणि उच्च श्रेणीतील रिटेलर्स यांना एकत्र आणून नव्या ट्रेंड्स आणि डिझाईन्स सादर करण्यासह, उद्योगातील सहकार्य व नवोन्मेषाला चालना देणारा एक खास मंच आहे. या वर्षीच्या डी शोची थीम “The Artisans Behind the Allure” असून, ही थीम हिऱ्यांच्या कारागिरांच्या सर्जनशीलतेला आणि गुणवत्ता-निष्ठेला गौरव देते. यंदाचे प्रदर्शन उद्योगाला भविष्याच्या दिशेने नेणाऱ्या दृष्टीकोनावर केंद्रित आहे.
या खास प्रदर्शनात ६० पेक्षा अधिक निवडक डायमंड ज्वेलरी उत्पादक सहभागी होणार असून, ३०० हून अधिक आधुनिक व आकर्षक डिझाइन्स सादर केल्या जाणार आहेत. IGI च्या मते, यंदा सुमारे १५,००० चौरस मीटर क्षेत्रफळात जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. येथे असंख्य स्टॉल्सवर प्रीमियम दर्जाच्या हिरे दागिन्यांचा संग्रह, फॅन्सी शेप डायमंड्स, तसेच कपड्यांचे हाय-एंड संग्रहही उपलब्ध असतील.
IGI चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO तहमास्प प्रिंटर म्हणाले, “IGI डी शो आता पारंपरिक बायर-सेलर मीटिंगपलीकडे जाऊन एक समुदाय-केंद्रित नेटवर्किंग इव्हेंट झाला आहे. आमचा उद्देश आहे उद्योगातील सहकार्य वाढवणे, नाविन्य जपणे आणि विश्वासाचे संबंध निर्माण करणे.” ते पुढे म्हणाले की, “हे प्रदर्शन डायमंड उद्योगात कारागिरी, गुणवत्ता आणि सर्जनशीलतेचा उच्च दर्जा जपणाऱ्या ब्रँड्सना एकत्र आणते. यामुळे ग्राहकांपर्यंत अधिक चांगली उत्पादने पोहोचण्यास मदत होते.” IGI डी शो 2025 हे भारताच्या डायमंड उद्योगातील जागतिक महत्त्व अधोरेखित करणारे एक अत्यंत भव्य आणि प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.