फोटो सौजन्य - Social Media
IAS अधिकारी बनण्यासाठी कठोर मेहनत, सातत्य आणि ध्येयाची निष्ठा लागते. पण केरळच्या निसा उन्नीराजन यांची कहाणी या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक प्रेरणास्त्रोत ठरते. वयाच्या 40व्या वर्षी, दोन मुलींची आई असूनही, कर्णबधिरतेसारख्या वैयक्तिक अडचणींना मागे टाकत त्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवलं आणि 1000वी रँक पटकावली.
निसा यांचं आयुष्य पारंपरिक गृहिणीपेक्षा वेगळं आहे. त्यांना नेहमीच काही तरी ‘बिगर’ करायचं होतं. मात्र, घर, मुलं, आणि नोकरी या सगळ्यांचा समतोल राखताना स्वप्न बाजूला ठेवावी लागतात, हे अनेकांचं वास्तव असतं. पण निसा यांचं यावर उत्तर वेगळं होतं. वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी UPSC साठी गंभीर तयारी सुरू केली. त्यांची दोन मुली नंदना (11) आणि थानवी (7) यांची जबाबदारी, रोजच्या घरकामाची व्यस्तता आणि कानाने ऐकू न येण्याची समस्या असूनही, त्यांनी हार मानली नाही.
निसा यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक अतिशय काटेकोर होतं. सकाळी मुलींना शाळेसाठी तयार करणे, नंतर घरकाम, नोकरी आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास हा त्यांच्या दिवसाचा क्रम होता. त्यांच्या पती अरुण (सॉफ्टवेअर इंजिनीयर) आणि निवृत्त आई-वडिलांनी त्यांना सर्वतोपरी पाठिंबा दिला. सर्वात मोठं आव्हान होतं. त्यांची ऐकण्याची अडचण. पण त्यांनी याला कमकुवतपणा न बनू देता, प्रेरणादायी ताकद बनवलं. कोट्टायमचे सब-कलेक्टर रंजीत, जे स्वतःही ऐकण्याच्या अडचणींनंतर IAS झाले होते, यांच्यापासून प्रेरणा घेत निसा यांनी स्वतःवर विश्वास ठेवला.
पहिल्या 6 प्रयत्नांत त्यांना अपयश मिळालं, पण त्यांनी प्रत्येक अपयशातून शिकत सातव्यांदा UPSC परीक्षा पास केली. त्यांनी विषयांचे छोटे भाग पाडून त्यांचा अभ्यास केला, सातत्याने रिविजन केलं आणि टाइम मॅनेजमेंटवर भर दिला. मोटिवेशनल व्हिडिओ आणि टॉपर्सच्या कहाण्यांनी त्यांना मानसिक बळ दिलं. निसा उन्नीराजन यांची ही यशोगाथा ही केवळ UPSC यशाची कथा नाही, तर इच्छाशक्ती, वेळेचं व्यवस्थापन, आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने जीवनातील कोणतीही स्वप्न पूर्ण करता येतात, याचा जिवंत पुरावा आहे. त्या आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरल्या आहेत.