फोटो सौजन्य - Social Media
ॲमेझॉन इंडियामध्ये ‘मार्केटिंग मॅनेजर, वायरलेस’ पदावर कार्यरत असलेल्या जिज्ञासा जैन या उत्तम नेतृत्वगुणांसोबतच गुणवत्तापूर्ण कामाची खात्री देणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. अलीकडेच पार पडलेल्या ‘ॲमेझॉन प्राइम डे 2025’ या मोठ्या इव्हेंटमागे असलेल्या यशस्वी टीमपैकी त्या एक महत्त्वाचा भाग होत्या. ग्राहकांना सुरळीत खरेदी अनुभव देण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
एम. फार्मा पदवी सुवर्णपदकासह मिळवून त्यांनी रिसर्च सायंटिस्ट म्हणून कारकीर्द सुरू केली. मात्र, मार्केटिंग क्षेत्रातील आवड आणि धोरणात्मक कामातील गतीमुळे त्यांनी क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला. पुरुषप्रधान क्षेत्र असलेल्या सेल्समध्ये ‘मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह’ म्हणून काम करताना त्यांनी आव्हानं समर्थपणे पेलली. नंतर गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पूर्ण करून फार्मसी विषयावर आधारित एडटेक स्टार्टअपही सुरू केलं. शिक्षणातून समाजऋण फेडण्याचा त्यांचा ध्यास दिसून आला.
त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत HUL ने त्यांना भारतातील सर्वोत्तम ३५ लीडर्समध्ये स्थान दिलं. ॲमेझॉनमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी मोठ्या उद्योगसमूहात ई-कॉमर्स व जाहिरात क्षेत्रात अनुभव मिळवला. सप्टेंबर २०२२ मध्ये ॲमेझॉनमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी वायरलेस उपकरणांच्या श्रेणीवर काम करत ग्राहककेंद्रित मार्केटिंगला चालना दिली. प्रत्येक उपक्रमामध्ये त्या नवकल्पनांचा अवलंब करतात. ‘प्राइम डे’ दरम्यान व नंतर ग्राहकांचा अनुभव उत्तम व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. उत्पादनांच्या मूल्यनिर्धारणात, ब्रँड भागीदारी आणि जाहिरातींमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे.
कामासोबतच जिज्ञासा यांनी आरोग्याच्या आव्हानांनाही समर्थपणे तोंड दिलं. अलीकडच्या काळात त्यांनी काही शस्त्रक्रिया व वैयक्तिक अडचणींना सामोरे जात काम व आरोग्यातील समतोल साधला. त्या सांगतात की, ॲमेझॉनने दिलेली लवचिकता आणि सहकार्यामुळे ही शक्यताच निर्माण झाली. ‘इन्ट्राप्रेन्युअर’ पुरस्कार मिळाल्याचा त्यांना विशेष अभिमान आहे. त्यांच्या मते, ॲमेझॉनची ‘कस्टमर ऑबसेशन’ व ‘बायस फॉर ॲक्शन’ ही नीतितत्त्वं केवळ कामात नव्हे तर वैयक्तिक संघर्षांमध्येही मार्गदर्शक ठरली. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून समर्पण, चिकाटी आणि नेतृत्वाचे उत्तम दर्शन घडते.