
फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आणि जिल्हा परिषद निवडणूक मतदान एकाच दिवशी 7 फेब्रुवारी 2026 रोजी असल्यामुळे राज्यातील शेकडो शिक्षकांचे करिअर धोक्यात आले असून, निवडणुकीच्या कामातून संबंधित शिक्षकांना वगळण्यात यावे, अशी जोरदार मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला लेखी निवेदन पाठवले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदानाची तारीख सुरुवातीला 5 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आणि मतदानाची तारीख 7 फेब्रुवारी 2026 अशी जाहीर करण्यात आली. याच दिवशी देशभरात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बंधनकारक
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार देशातील सर्व कार्यरत शिक्षकांनी निश्चित कालावधीत टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे पालन करण्यासाठी महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शिक्षकांनी सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. ही परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी देशभर विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
अशा परिस्थितीत, जर या शिक्षकांची निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती करण्यात आली, तर त्यांना सीटीईटी परीक्षेस अनुपस्थित राहावे लागण्याची वेळ येईल. ही परीक्षा वर्षातून मोजक्याच वेळा घेतली जाते. एक संधी हुकल्यास शिक्षकांना पुन्हा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या सेवासुरक्षिततेवर, पदोन्नतीवर आणि करिअर प्रगतीवर होऊ शकतो.
प्रवास व निवासाची अडचण
अनिल बोरनारे यांनी नमूद केले की, अनेक शिक्षकांची परीक्षा केंद्रे त्यांच्या कार्यस्थळापासून दूर असलेल्या मुंबई, पुणे किंवा इतर शहरी जिल्ह्यांत देण्यात आली आहेत. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी शिक्षकांना किमान एक दिवस आधी प्रवास करणे, निवासाची व्यवस्था करणे आणि वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अत्यावश्यक ठरते.
‘कर्तव्य विरुद्ध करिअर’ची परिस्थिती
निवडणूक कर्तव्य ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, याबाबत कोणताही वाद नाही. मात्र, राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा हीसुद्धा तितकीच महत्त्वाची व कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. दोन्ही जबाबदाऱ्या एकाच दिवशी आल्याने शिक्षकांपुढे ‘कर्तव्य विरुद्ध करिअर’ अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे बोरनारे यांनी स्पष्ट केले.
तात्पुरत्या सवलतीची मागणी
या पार्श्वभूमीवर, सीटीईटी परीक्षेस बसणाऱ्या शिक्षकांना प्रवेशपत्र सादर केल्यास 7 व 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीत निवडणूक कर्तव्यातून तात्पुरती सवलत द्यावी, अशी ठाम मागणी अनिल बोरनारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही समस्या प्रशासनाच्या निर्णयातून सहज सोडवता येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले आहे.