फोटो सौजन्य - Social Media
भारतात चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही केवळ डिग्री नाही, तर ती एक प्रतिष्ठेची, कौशल्याची आणि जबाबदारीची व्यावसायिक ओळख मानली जाते. अनेक तरुण-तरुणींचं हे स्वप्न असतं, पण अनेकदा त्यांना आर्थिक अडचणींमुळे गोंधळ वाटतो की, CA व्हायचं म्हणजे नक्की काय करावं लागतं? किती पैसे खर्च येतात आणि नंतर पगार किती मिळतो? चला तर मग जाणून घेऊया याचे संपूर्ण आर्थिक गणित.
CA म्हणजे अशी व्यक्ती जी अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑडिट, फायनान्स व बिझनेस अॅडव्हायजरी यासारख्या क्षेत्रात तज्ज्ञ असते. कंपन्या, सरकारी संस्था किंवा वैयक्तिक क्लायंटसाठी ते आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात. भारतामध्ये ICAI (The Institute of Chartered Accountants of India) ही अधिकृत संस्था आहे जी हा कोर्स चालवते. ICAI ची स्थापना १ जुलै १९४९ रोजी झाली असून याच दिवशी दरवर्षी राष्ट्रीय CA दिन साजरा केला जातो.
CA कोर्स पूर्ण करण्यासाठी चार टप्पे असतात. सर्वप्रथम १२वी नंतर CA Foundation परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर CA Intermediate, मग तीन वर्षांची प्रत्यक्ष कामाची ट्रेनिंग म्हणजेच Articleship, आणि शेवटी सर्वात महत्त्वाची CA Final परीक्षा द्यावी लागते. जर सर्व परीक्षा एका प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या तर संपूर्ण प्रक्रिया साधारणतः ४.५ ते ५ वर्षांत पूर्ण होते.
आता प्रश्न येतो तो खर्चाचा. Foundation टप्प्यासाठी साधारण ₹40,000 ते ₹70,000 पर्यंत खर्च येतो. Intermediate साठी ₹80,000 ते ₹2 लाख, आणि Final साठी ₹1 ते ₹1.5 लाख खर्च अपेक्षित असतो. याशिवाय स्टडी मटेरियल, री-अटेम्प्ट, ट्रेनिंग यावरही काही अतिरिक्त खर्च होतो. एकूण मिळून जर सर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केल्या, तर सुमारे ₹3 ते ₹4 लाखांत हा कोर्स पूर्ण होतो.
CA झाल्यावर मिळणाऱ्या पगाराबाबत बोलायचं झालं, तर फ्रेशर्सना वार्षिक ₹6 ते ₹10 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. अनुभवी चार्टर्ड अकाउंटंटचा पगार ₹12 ते ₹50 लाखांपर्यंत जाऊ शकतो. जे स्वतःची प्रॅक्टिस करतात, त्यांना त्यांच्या क्लायंटच्या संख्येनुसार ₹10 लाखांपासून ₹1 कोटींपर्यंतही उत्पन्न मिळू शकतं. परदेशातही या क्षेत्रात मोठ्या संधी आणि भरघोस पगार मिळतो.
CA झाल्यानंतर करिअरच्या अनेक वाटा खुल्या होतात – ऑडिट, टॅक्स सल्लागारी, फायनान्शियल अॅनालिस्ट, इन्वेस्टमेंट अॅडव्हायजर, रिस्क मॅनेजमेंट, सरकारी सेवा (जसं की CAG, RBI, PSU) आदी क्षेत्रांमध्ये रोजगाराची दारं उघडतात. थोडक्यात सांगायचं झालं, तर CA ही फक्त शैक्षणिक पदवी नसून, ती एक चाचणी आहे. चिकाटीची, मेहनतीची आणि व्यावसायिक समर्पणाची. जर तुमचं आर्थिक जगात करिअर करण्याचं स्वप्न असेल आणि तुम्ही त्यासाठी मेहनत करायला तयार असाल, तर CA ही तुमच्यासाठी उत्तम दिशा असू शकते.