फोटो सौजन्य - Social Media
विवा महाविद्यालय, मिरा-भाईंदर, विरार-वसई पोलीस आयुक्तालय आणि बोळींज पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ तसेच ‘नशा मुक्त भारत’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये व्यापक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘अँटी ड्रग स्पर्धा’ या नावाने घेण्यात आलेल्या या उपक्रमात रील बनवणे, गीत स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, समूह नृत्य इत्यादी विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता.
या उपक्रमाला पोलीस विभागाकडून मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, सहायक पोलीस निरीक्षक जयचंद्र ठाकूर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक निकम, तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. दरवर्षी २६ जून हा दिवस ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये नशाबंदीच्या संदर्भातील संवेदनशीलता आणि सजगता वाढवण्यासाठी या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी “नशा मुक्त भारत”, “औषध नव्हे विष”, “जगण्यासाठी नाही तर संपण्यासाठी आहे नशा” अशा विषयांवर अत्यंत प्रभावी सादरीकरणे सादर केली.
या उपक्रमात विविध शाखांतील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. गीत स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी नशेच्या दुष्परिणामांवर भाष्य करणारी भावनिक गाणी सादर केली, तर पोस्टर स्पर्धेत त्यांनी रंग, रेषा आणि कल्पकतेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले. रील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून नशाबंदीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन हे संस्थेच्या नेतृत्वामुळे शक्य झाले. विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय हितेंद्र ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर, तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन. पाध्ये आणि महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनुश्री किणी यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या संयोजन समितीतील सदस्य, एनएसएस युनिट, करिअर संसदेचे विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयीची समज, जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक बळकट झाली आहे. या उपक्रमामुळे समाजात अंमली पदार्थ विरोधी चळवळ अधिक व्यापक होण्यास मदत होईल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.