फोटो सौजन्य - Social Media
आरक्षणाचे जनक आणि सामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील महापुरुष जयंती उत्सव समितीने एक स्तुत्य उपक्रम राबवत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
३० जून २०२५ रोजी प्राथमिक शाळा पवारवाडी, पार्लेवाडी, गुडेकर कोंड व नाणेघोळ आदिवासी वाड्यांमधील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास वाकड ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम जंगम, उपसरपंच सौ. बाबर, नीलकंठ साने, तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक संतोष शेलार, मनोज सकपाळ, सोनावणे, समीर सालेकर आणि समितीचे संदीप जाबडे, विवेकांत मोरे, अरुण मोहिते, अमित वाडकर, नरेश मोरे, सिद्धेश पवार, मंथन मोरे, नरेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमादरम्यान बोलताना संदीप जाबडे यांनी सांगितले की, “महापुरुषांची जयंती ही फक्त पूजनापुरती न राहता, त्यांच्या विचारांचे स्मरण करणारी आणि समाजातील गरजूंना मदतीचा हात देणारी झाली पाहिजे. आम्ही मागील चार वर्षांपासून स्वखर्चातून ही साहित्यवाटपाची परंपरा जपतो आहोत.” अरुण मोहिते यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात अडथळे येतात. अशा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी आम्ही हे साहित्य वाटप करतो.”
विवेकांत मोरे यांनी शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक धोरणांचा उल्लेख करत सांगितले की, “शाहू महाराजांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार आणि जातीव्यवस्थेविरुद्ध उभारलेला आवाज यामुळेच महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती घडली.” हा उपक्रम शालेय पातळीवर सामाजिक बांधिलकी जोपासणारा असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासात सकारात्मक योगदान देणारा ठरतो आहे. अशा उपक्रमातूनच शाहू महाराजांचे विचार समाजात रुजतील आणि पुढच्या पिढीला योग्य दिशा मिळेल.