
फोटो सौजन्य - Social Media
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे फेज 1 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण व्यवस्था बसवण्यात आल्या आहेत. यामध्ये 4 किलोवॅट क्षमतेची सोलर नेट-मीटरिंग प्रणाली बसवण्यात आली असून ती संपूर्णपणे ग्रिड कनेक्टेड आहे. यामुळे स्मारक परिसरात स्वच्छ ऊर्जा वापर वाढेल आणि ऊर्जेचा खर्च कमी होईल. याशिवाय पाणी बचतीसाठी विशेष प्रकारचे हँड वॉश स्टेशन उभारण्यात आले आहे, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर कमी होईल. ग्रामीण भागात अत्यंत उपयोगी ठरणारा, वीज न लागणारा सब्जी कूलर बसवण्यात आला आहे, ज्यामुळे भाज्या-फळे जास्त काळ ताजी राहू शकतात. तसेच पिण्याच्या पाण्यातील गुणवत्तेचा प्रश्न लक्षात घेऊन गुरुत्वाकर्षण-आधारित अल्ट्राफिल्ट्रेशन व्यवस्था बसवण्यात आली आहे. ही प्रणाली वीजाशिवाय चालते आणि पाण्याचे सुरक्षित शुद्धीकरण करते. या सर्व तंत्रज्ञानांची अंमलबजावणी आता पूर्ण झाली असून फेज 1 चे औपचारिक हस्तांतरण आयआयटी बॉम्बेकडून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टकडे करण्यात येणार आहे.
या हस्तांतरण समारंभाचे आयोजन २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, ता. माणगाव, जि. रायगड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयआयटी मुंबईच्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सोल्यूशन्स सेल आणि उन्नत महाराष्ट्र अभियानाशी संलग्न प्रकल्प प्रमुख राजाराम देसाई हे उपस्थित राहणार आहेत. ते शाश्वत ऊर्जा, ग्रामीण विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे परस्परसंबंध यावर सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामीण विकासात काम करणारे कार्यकर्ते, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सरकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विकासाला तांत्रिक आणि शाश्वत दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञानवृद्धीसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्राकडून करण्यात आले आहे.