फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त आणि संस्कार देऊन उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट-गाईडची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी राज्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट-गाईडची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्रालयात आज या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, उपसचिव तुषार महाजन, क्रीडा विभागाचे सहायक संचालक व महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् चे राज्य चिटणीस मिलिंद दिक्षित उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह आणि एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. बैठकीत बोलताना मंत्री भुसे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या माता-पित्यांचा, वडीलधाऱ्यांचा आणि गुरुजनांचा आदर करणे, शिस्त अंगिकारणे या मूल्यांची गरज आहे. स्काऊट-गाईड, एनसीसी, आरएसपी यांसारख्या माध्यमांतून ही शिस्त आणि संस्कार लाभतात. त्यामुळे इच्छुक विद्यार्थी या उपक्रमांपासून वंचित राहू नयेत, याची दक्षता घ्यावी.”
मंत्री भुसे यांनी ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत स्काऊट-गाईडसाठी दर आठवड्याला एक तास घेण्याची सूचना केली. तसेच, ज्या शाळेत स्काऊट-गाईडचे विद्यार्थी आहेत, तेथे दिल्या जाणाऱ्या गणवेशांपैकी एक गणवेश स्काऊट-गाईडच्या अनुरूप ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्काऊटचा गणवेश उत्कृष्ट असून तो परिधान केल्यानंतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. त्यांच्या मते, गणवेश फक्त पोशाख नसून तो जबाबदारी, शिस्त आणि एकात्मतेचे प्रतीक आहे.
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी राज्यातील शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक योजना, प्रशिक्षण आणि साहित्य पुरवठा याबाबत चर्चा केली. ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये हा उपक्रम समान प्रमाणात राबविण्याचे धोरण ठरविण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. स्काऊट-गाईड चळवळ केवळ शालेय उपक्रम नसून ती विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सेवा वृत्ती आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्याचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे या उपक्रमाचा प्रसार करण्यासाठी शिक्षण विभाग सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट झाले.