
फोटो सौजन्य - Social Media
जागतिक रेडिओ दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोरेगाव येथे १३ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रेडिओ संच दाखवून त्यावरून प्रसारण ऐकवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी श्राव्य माध्यमाचा एक वेगळाच आणि अनोखा अनुभव घेतला. रेडिओ आजच्या युगातील मुलांना इतके ठाऊक नाही आहे. आजच्या काळातील मुलांना आधीच्या काळातील माध्यमांविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला होता.
कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापिका अंजली पुडे व शिक्षक राजेश हिवाळे यांनी रेडिओचा इतिहास, त्याची कार्यपद्धती आणि समाजजीवनातील योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली. माहिती, शिक्षण आणि मनोरंजन या तिन्ही क्षेत्रांत रेडिओने दिलेले योगदान अधोरेखित करताना आकाशवाणी ची महत्त्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.
मुख्याध्यापिका अंजली पुडे यांनी सांगितले की, “मोबाईल आणि इंटरनेटच्या युगातही रेडिओचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असले तरी रेडिओसारख्या माध्यमाची विश्वासार्हता आणि प्रभाव आजही कायम आहे. वीज नसतानाही बॅटरीवर चालणारे हे माध्यम दुर्गम भागात माहिती पोहोचवते.” त्यांनी जुन्या काळातील रेडिओ प्रसारणाच्या आठवणींनाही उजाळा दिला.
शाळेत आणलेल्या जुन्या रेडिओ संचावरून बातम्या, गाणी आणि लोकप्रिय कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आली. गीतमाला, क्रीडा समालोचन आणि बातम्यांची झलक ऐकताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद दिसून येत होता. शिक्षकांनी सांगितलेल्या “पूर्वी संपूर्ण कुटुंब एकत्र बसून रेडिओ ऐकत असे” या आठवणींनी वातावरण भारावून गेले. मुलांना कळाले की आधीच्या काळातील प्रसार माध्यमांची एक वेगळीच मज्जा होती. आजच्या सोशल मीडियावर एकटे माध्यमं अनुभवणे आणि कालच्या जगातील एकत्र बसून प्रसार माध्यमे अनुभवणे यात मोठा फरक आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रेडिओ प्रसारणाच्या सुवर्णकाळाची ओळख झाली. ज्ञान आणि संस्कृतीचा सुरेल संगम साधत शाळेने विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच जुन्या स्मृतींनाही उजाळा दिला. यावेळी राजेश हिवाळे, मनोज घुले, शंकर राऊत, बसवराज उदे, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाढवे, मनोज मस्के, नीलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, परमेश्वर मस्के, सचिन पाटसकर, शामीर शेख, अली बाकोदा, कल्याणी जगताप आदी उपस्थित होते.