
फोटो सौजन्य - Social Media
यूपीएससी 2018 मध्ये पहिला क्रमांक पटकावणारा कनिष्क कटारिया आज लाखो स्पर्धकांसाठी आदर्श ठरला आहे. (IAS Success Story) आयआयटी बॉम्बेचा माजी विद्यार्थी असलेल्या या तरुणाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात भारतातील सर्वात कठीण परीक्षेत अव्वल येत इतिहास रचला. कनिष्क एका नामांकित परदेशी कंपनीत जवळपास एक कोटी रुपयांचा वार्षिक पगार कमावत होता. पण त्याच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती. समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने त्याने ती उच्च पगाराची नोकरी सोडून IAS अधिकारी होण्याचा मार्ग निवडला. त्याच्या या निर्णयाने त्याचे देशप्रेम आणि निश्चय अधोरेखित झाला.
त्याची तयारी अत्यंत शिस्तबद्ध होती. दररोज तो १४ तास अभ्यास करत असे आणि सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद करून पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले होते. दिल्लीतील कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत असताना त्याने स्वअभ्यासालाही महत्त्व दिलं. कनिष्कच्या मते, “यश मिळवण्यासाठी सातत्य, संयम आणि आत्मविश्वास हीच खरी गुरुकिल्ली आहे.”
कुटुंबाचा आणि त्याच्या मैत्रिणीचा पाठिंबा हा त्याच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग होता. निकालाच्या दिवशी AIR 1 मिळाल्याचं कळल्यावर त्यालाही विश्वास बसत नव्हता. आज कनिष्क कटारियाची कथा प्रत्येक तरुणाला प्रेरणा देते की पैशांपेक्षा देशसेवेचं समाधान मोठं असतं. कठोर परिश्रम, स्पष्ट उद्दिष्ट आणि मनापासून प्रयत्न केले तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही.
अशा प्रकारे करा UPSC अभ्यास: यशाची खात्री!
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते, पण योग्य नियोजन आणि सातत्य असेल तर यश नक्की मिळतं. सर्वात आधी सिलॅबस पूर्ण समजून घ्या आणि त्यानुसार अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा. दररोज किमान ८ ते १० तास अभ्यास करा. वृत्तपत्र वाचण्याची सवय लावा, कारण चालू घडामोडी या परीक्षेचा महत्त्वाचा भाग आहेत. NCERT पुस्तके ही पायाभूत तयारीसाठी सर्वोत्तम आहेत. त्यानंतर मानक संदर्भ पुस्तके वापरा.
उत्तरलेखनाचा सराव नियमित करा. वेळ ठरवून टेस्ट सिरीज द्या, त्यामुळे लेखन कौशल्य आणि गती वाढेल. सोशल मीडियापासून थोडं दूर राहा आणि अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास आणि संयम ठेवा. UPSC ही फक्त परीक्षा नाही, तर एक प्रवास आहे आणि ज्याच्याकडे निर्धार आहे, तो नक्कीच गाठतो ‘IAS’चं स्वप्न!