फोटो सौजन्य - Social Media
नवी मुंबईतील हिंदलॅब्स खारघर प्रयोगशाळेने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट (CAP) कडून मान्यता मिळवत ती सीएपी मान्यता प्राप्त भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील प्रयोगशाळा ठरली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एचएलएल लाइफकेअर लिमिटेड (HLL) या सरकारी कंपनीने ही माहिती दिली. (Career)
हिंदलॅब्स ही देशव्यापी निदान (Diagnostic) साखळी असून खारघर केंद्राला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके पूर्ण करून अचूक आणि विश्वासार्ह चाचणी निकाल देण्याच्या क्षमतेसाठी ही मान्यता मिळाली आहे. एचएलएल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही उपलब्धी नागरिकांना परवडणाऱ्या, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे.
सीएपी मान्यता ही निदान प्रयोगशाळांसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त गुणवत्ता बेंचमार्क आहे. या मान्यतेमुळे प्रयोगशाळेत रुग्णसेवा, चाचणी अचूकता आणि सुरक्षा मानकांचे सर्वोच्च पालन केले जात असल्याचे सिद्ध होते. हिंदलॅब्स खारघर प्रयोगशाळेने कठोर ऑडिट प्रक्रिया पार करत उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे.
एचएलएल ही गेल्या नऊ वर्षांपासून महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठ्या राज्यव्यापी मोफत प्रयोगशाळा सेवा कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करत आहे. “महालॅब्स सेवा” म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम राज्य सरकारसाठी राबविला जात आहे. एचएलएलने 134 हिंदलॅब्स स्थापन केल्या आहेत ज्या दररोज 50,000 हून अधिक रुग्णांचे नमुने हाताळतात. या प्रयोगशाळा 3,600 हून अधिक सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील रुग्णांना अचूक आणि विश्वासार्ह चाचणी अहवाल देतात, ज्यामुळे वेळेवर निदान, प्रभावी उपचार आणि सुधारित आरोग्य परिणाम सुनिश्चित होतात. प्रत्येक प्रयोगशाळा आधुनिक चाचणी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहे आणि गुणवत्ता नियंत्रण आणि हमी मानकांचे काटेकोरपणे पालन करते.
हिंदलॅब्सच्या ६ प्रयोगशाळांना आधीच NABL मान्यता मिळाली असून सर्व प्रयोगशाळा पूर्णपणे डिजिटल पद्धतीने कार्यरत आहेत. एचएलएलने २००८ मध्ये दिल्लीपासून सुरुवात करून आज २० राज्यांमध्ये २३० हून अधिक प्रयोगशाळांचे नेटवर्क उभारले आहे. या माध्यमातून आतापर्यंत ८ कोटीहून अधिक रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.






