
teacher award
National Teachers Award 2026 Kunda Bachhav : शिक्षकाच्या कामावरील निष्ठा आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे महानगरपालिकेच्या शाळा देखील राष्ट्रीय स्तरावर नावलौकिकता प्राप्त करू शकतात, हे नाशिक महानगर पालिकेच्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी सिद्ध करून दाखवले आहे. नुकताच शिक्षक दिनानिमित्त पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वर्षी महाराष्ट्रातून हा पुरस्कार मिळवणाऱ्या चार शिक्षकांमध्ये त्याचा समावेश आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली येथील शाळा क्रमांक १८ मध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या कुंदा बच्छाव २००५ पासून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन संपूर्ण गावच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माध्यम बनले पाहिजे, या उद्देशाने त्यांनी आनंदवली गावात ‘ज्ञानभिंती’ हा अनोखा उपक्रम सुरू केला.
लोकसहभागातून गावातील जवळपास ३० ते ३५ घरांच्या भिंतींवर सुंदर नकाशे, इंग्रजी शब्द आणि गणिताची सूत्रे रंगवण्यात आली. यामुळे मुले मोबाईलमध्ये वेळ घालवण्याऐवजी भिंतीवरील शैक्षणिक मजकूर वाचू लागली आणि कोडी सोडू लागली. या उपक्रमाने गावातील शिक्षणाचे चित्रच बदलून टाकले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी ‘स्मार्ट अटेंडन्स’ म्हणजेच स्मार्ट ओळखपत्राची संकल्पना राबवली. विद्यार्थी शाळेत आल्यावर आणि घरी जाताना हे ओळखपत्र स्कॅन करतात, ज्यामुळे उपस्थितीचा मेसेज थेट पालकांच्या मोबाईलवर पोहोचतो. यामुळे पालकांची चिंता मिटली असून विद्यार्थ्यांची शाळेतील नियमितता वाढली आहे. याशिवाय, लोकसहभागातून शाळेला डिजिटल साहित्य मिळवून त्यांनी शाळा स्मार्ट बनवली.
संविधान सापशिडी, मूल्यमापन शिडी आणि विद्यार्थ्यांची इस्रो (ISRO) भेट असे अनेक स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे नाशिक महापालिकेच्या शाळेचे नाव देशभरात उज्ज्वल झाले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.