
फोटो सौजन्य - Social Media
AI-संचालित हायरिंग प्रक्रियेबाबत संभ्रम
हायरिंग प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर होत असला, तरी अनेक उमेदवारांना या प्रणालीमध्ये यश मिळेल की नाही, याबाबत खात्री नाही. संशोधनात दिसून आले की, ८७ टक्के प्रोफेशनल्स कामाच्या ठिकाणी एआयचा वापर करण्यास सहज आहेत, मात्र भरती प्रक्रियेत एआयचा वापर होतो यामुळे अनेकांना अस्वस्थता वाटते. ७७ टक्के प्रोफेशनल्सना भरती प्रक्रिया खूप टप्प्यांची वाटते, तर ६६ टक्के प्रोफेशनल्सना ही प्रक्रिया अत्यंत तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याची भावना आहे.
स्पर्धा तीव्र, उमेदवारांचा आत्मविश्वास डळमळीत
लिंक्डइनच्या डेटानुसार, २०२२ पासून भारतात प्रत्येक रिक्त नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे, त्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढली आहे. याचा थेट परिणाम उमेदवारांच्या आत्मविश्वासावर होत असून, ४८ टक्के प्रोफेशनल्सना आपला अर्ज इतरांपेक्षा वेगळा कसा ठरवावा, याचा संघर्ष करावा लागत आहे. ही अडचण केवळ उमेदवारांचीच नाही, तर ७४ टक्के रिक्रूटर्सनाही पात्र उमेदवार शोधणे अधिक कठीण झाल्याचे या अहवालात नमूद आहे.
AI: आत्मविश्वास वाढवणारे साधन
या सर्व आव्हानांमध्ये एआय हे केवळ उत्पादकता वाढवणारे नाही, तर आत्मविश्वास देणारे साधन ठरत असल्याचे चित्र आहे. ९४ टक्के प्रोफेशनल्स नोकरी शोधात एआयचा वापर करण्याचा विचार करत आहेत, तर ६६ टक्के प्रोफेशनल्सना मुलाखतीदरम्यान एआयमुळे आत्मविश्वास वाढल्याचे वाटते.
करिअरचे बदलते मार्ग
या परिस्थितीमुळे अनेक प्रोफेशनल्स पारंपरिक करिअर मार्गांऐवजी नव्या दिशांचा विचार करत आहेत. ३२ टक्के जनरेशन एक्स आणि ३२ टक्के जनरेशन झेड उमेदवार आपल्या सध्याच्या क्षेत्राबाहेर नोकरी शोधत आहेत. उद्योजकतेकडेही कल वाढताना दिसत असून, लिंक्डइनवर ‘फाउंडर’ ही भूमिका वेगाने वाढत आहे.
कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक मागणी?
लिंक्डइनच्या ‘Jobs on the Rise 2026’ अहवालानुसार, प्रॉम्प्ट इंजिनिअर, एआय इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर ही पदे सर्वाधिक मागणीमध्ये आहेत. याशिवाय सायबर सिक्युरिटी, ब्रँड स्ट्रॅटेजी, सेल्स, सोलर कन्सल्टंट, वेटरिनर आणि बिहेविरल थेरपिस्ट यांसारख्या भूमिकांनाही चांगली मागणी आहे. बदलत्या रोजगार बाजारात टिकून राहण्यासाठी कौशल्यवृद्धी, एआयचा योग्य वापर आणि नेटवर्किंग अधिक महत्त्वाचे ठरत असल्याचे हे संशोधन स्पष्ट करते.